Tuesday, April 14, 2009

पहाटधारा
कोऱ्या नभात माझ्या, तो कृष्णमेघ शिरला
सचैल मनातून भिजलो, मन श्रीमंत मग वाटले

कोण्या पहाटरात्री गेली दरवळोनि रातराणी
इतुके भरुन आले, नयनी दवबिंदु दाटले

नभी मेघ पिंजलेले, मृद् गंध दाटलेला
पर्जन्य स्वागतासी, स्वर्गात देव नटले

ते बिंब उगवता लाल, स्वच्छंद घनांच्या मागे
मेघांतुनी कवडसे जणु अंकूर बिजांतुनि फुटले

अतृप्त पाहता माती, संपृक्त जाहले मेघ
गुंफून ठेवलेले, मोती अखेर तुटले

ते इंद्र्धनुष लोभस, राजस न रंग त्याचे
वेड्या नभावरी मग, ते ॠण धरेचे फिटले

ती गोड भैरवी होती, मल्हार बरसला त्यात
शून्यात मी बुडालो, डोळे क्षणात मिटले


-निखिल अनिल जोशी