Sunday, November 15, 2009

या शब्दांनो, परत फिरा रे

कधी द्यायचे शब्द साथ मज, ऊन्ह-पावसा दरिशिखरातून
आज गिळाया उठले आहे एकाकीपण क्षणाक्षणातून

खिन्न होतसे तेव्हाही मी, अडकत धडकत जगत असे
कधी झुल्यातुन उंच ढगांवर, खोल कधी मी पडत असे
नसे शाश्वती जरी यशाची, पराजयाने मी न खचे
नसे निश्चिती मज मार्गाची, वहीवाटेहुन वळण रुचे

प्रवास माझा ऐसा होता, हर्षामधुनी गाणी झरली
डोळ्यांमध्ये दाटे पाणी, कविता तेव्हा खरी बहरली
पाहुन डोळे ओले धावे, सरस्वती अश्रूंस पुसाया
उदार होउन उधार देई, शब्द कवीतेतुन गुंफाया
क्षणात गाणे स्फुरे व्यथांचे, षड्ज नवेल्या चैतन्यातून
निर्माल्यातून कळी फुले मग, पर्ण पल्लवित पाचोळ्यातून

तिमीर दाटता दाहि दिशांनी, जिथे साथ सावली सोडते
तिथे माउलीपरी जिव्हाळा, सखे शब्द मज लावत होते
आनंदाच्या समयी क्षणभर मी न विसरलो त्यांना तेव्हा
दुःखी अन् एकाकी मज नच कधी सोडले त्यांनी तेव्हा


आज 'यशस्वी' होण्यासाठी शब्द सोडले, विचार धरला
कल्पनेतला विहार सोडून, बुद्धीवादी प्रवाह धरला
सळसळणारे भाव टाकुनी पोसत आहे हिशोब सारे
कसे जगावे स्वच्छंदी, जर भावबुद्धी हे विजोड वारे

गार्दीमध्ये मित्र हरवले, डाव खेळले फसले आहेत
आज भूताचा मार्ग काढता, शब्द मजवरी रूसले आहेत
यशस्वीता घ्या शब्दांनो, पण मनस्वीता मज परत करा रे
क्षयअक्षय्यामधली सीमा, पुन्हा एकदा ठळक करा रे


- निखिल अनिल जोशी
२८-१०-२००९
हैदराबाद