Saturday, January 2, 2010

हैड्राबादनामा: बस पहावी धरून १

आमच्या हैदराबादच्या लोकांचे अनेक गोड गैरसमज आहेत. त्यांना मनापासून वाटतं की हैदराबादचे अत्याधुनिक बस स्टॉप्स म्हणजे पेन्शनारांसाठी बांधलेली विश्रांतिगृहे, रिकामटेकड्या लोकांसाठी बनवलेले पिकनिक स्पॉट्स किंवा प्रेमी युगुलांसाठी बांधलेली meditation centres असावेत. दिवसभर निरनिराळ्या समाजघटकांकडून असा पुरेपूर वापर झाल्यानंतर रात्री ते भिकारी, फेरीवाले, 'विविध' प्रकारचे लघुउद्योजक यांचा संसार थाटण्यासाठी उपलब्ध होतात. तर सांगायचा मुद्दा असा की, खरा हैदराबादी (विश्वास ठेवा, एवढ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण न होऊ शकणारे लोकही हैदराबाद मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात) बसची वाट बघत बसस्टॉपवर शांतपणे पेपर वाचत उभा आहे असे दृश्य दिसल्यास आपले गाव चुकले याची खात्री बाळगावी. आयडिअल केसमध्ये उतारू रस्त्याच्या पहिल्या लेनमध्ये दाटीवाटीने उभे राहतात. त्यांच्या अशा समजूतदारपणामुळे बस ड्रायव्हरचे लेन बदलून बस डावीकडे घेण्याचे कष्ट वाचतात. हां, आता दोन्ही लेन ब्लॉक झाल्यामुळे थोडसं ट्रॅफीक जॅम, मागच्या गाड्यांचं कर्णकर्कश विव्हळण, मग प्रेमाचे दोन-चार संवाद अशी थोडीशी किंमत द्यावी लागते, पण लोकांच्या आणि ड्रायव्हरच्या सोयीपुढे ती नगण्य असते. आता तर ओतप्रत भरलेली उपजत बुद्धीसंपदा आणि हळव्या मनाला हेलकावणारी सामाजिक जाणीव यांच्या जोरावर समस्त ड्रायव्हर बंधूंनी यावरही एकमताने उपाय शोधून काढला आहे. दुसर्‍या लेनमध्ये बस थांबवून मागच्यांचा खोळंबा करण्यापेक्षा ते बसचा वेग किन्चितसा कमी करतात. यामुळे बहुमूल्य वेळ आणि खर्चिक इंधन यांची बचत तर होतेच, शिवाय पळत पळत बस पकडावी लागत असल्यामुळे तेवढाच व्यायाम होऊन आज सबंध हैदराबादच्या आरोग्यपातळीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. बसमधील प्रवासी म्हणजे साक्षात मानवतेचा निर्झर!!! पाच ते दहा जण सतत बसच्या दरवाजातील पायर्‍यावर उभे असतात. आत येऊ इच्छिणार्‍यांना हात देणं एवढच त्यांचं काम. या माणुसकीच्या कामामुळे त्याना कधीकधी तिकीटही माफ केले जाते. कंडक्टरने तिकीट विचारताच ते नम्रपणे चालत्या बसमधून अलगदसे रस्त्यावर उतरतात आणि मागून येणार्‍या चालत्या बसमध्ये एखाद्या कारागिराच्या कुशलतेने चढतात. तिकडे त्याना हात दिला जातो आणि माणुसकीची परतफेड होते. असं ऐकण्यात येतय की हैदराबाद मॉडेलचे घवघवीत यश पाहता संपूर्ण भारतात हीच व्यवस्था राबवण्याचा सरकार विचार करत आहे.

मीही एकदा भारावून जाऊन चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला होता. पण एका हातात दरवाजातल्या माणसाचा हात, एका हातात खिडकीचा गज आणि दोन्ही पाय हवेत असा चित्तथरारक प्रवास केल्यानंतर गपचूप भरल्या पीतांबरासाहित पांढरपेश्या रिक्षात बसलो. तुकारामबुवा हसून म्हणाले, 'तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचे, येरागबाळाचे काय काम".