Monday, November 14, 2011

गुंड्या आणि बंड्यायक कुटुंब व्हतं भलं
घरामंदि सुख त्यांच्या खेळं
सोसुनी भुकेची झळं
केलं कष्ट चाखाया फळं
कष्टाचि मिळाली फळं
लवकरच झालं अन् जुळं
(यक गुंड्या नि यक बंड्या)
गुंड्या शाणं, बंड्या खुळं
गुंड्या चिकनं गोरंपान
बंड्या कुळकुळीत हो काळं
(त्यांच्या आईला प्रश्न पडला)
द्येवा असं कसं हो झालं?


(दोघं साळंला जाऊ लागले)
गुंड्या हुश्शार आनी न्येकं
वर्गामंदी नंबर येकं
बंड्या कसा करंटा लेकं
परिक्षेत फ्रॉड अन् फेकं
गुरुजी म्हणाले 'इनफ'
काढले जालीम औषध येकं
आधि दिला छड्यांचा शेकं
मग म्हणाले 'गिव्ह हिमं ब्रेकं'

गुंड्या येळीच म्याट्रिक झालं
बंड्या किती किती व्हं ढकललं
सातव्या यत्तेस असं चिकटलं
ह्याच्यापरीस फेविकॉल बरं
(गुरुजींना प्रश्न पडला)
द्येवा असं कसं हो झालं?


गुंड्या कालेजात जाई
बंड्या गल्लीमधला भाई
अशी वरसं गेले काही
गुंड्या पोलीस खात्यात इन
बंड्या हप्ता अन् स्मगलिंग
गुंड्या पराक्रम नवनवा
आनि बंड्या........
नवनव्या जेलांची हवा


येके दिवशी चिमित्कार झाला
घरामंदी फोन वाजला
हिकडं आयेनं फोन उचलला
पलिकडून आवाज आला
तोऱ्यात बाबू बोलला
'तुमचा बंड्या मंत्री झाला नि गुंड्या शिक्यूरिटी'
आज बंड्या ऐटीत चालं नि गुंड्या शेपटी
हाच जगाचा न्याव असे हो द्येवा, जि रं दाजि रं जी जी, रं जी जी जी जी हो!(आय.आय.टी. कानपूरमधील महाराष्ट्र मंडळाच्या 'प्रतिबिंब' या २००९ साली झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात हा परफॉर्मन्स केला होता.)    - निखिल अनिल जोशी
   १४ जानेवारी २००९
   कानपूर

Sunday, November 6, 2011

घरटे


धडपडणारे चार हात
पाउस-वारा-अंधारातहि
प्रकाशलेली अंतर्वात

चार डोळे एक दृष्टी
सुंदर बनवू आपुली सृष्टी

एकेक वीट रचत रचत
चौतीस वर्षे पडत उठत
भातुकलीचे इवले घरटे
आज जाहले उदंड मोठेघरट्यामध्ये राजा-राणी
अखंड उत्साही सहकारी
सहकाऱ्यांची छोटी गावे
गावामधल्या हतबल स्त्रिया
सोशित ज्वाळा स्त्रीरोगाच्या
लाथा दारूड्या नवऱ्याच्या
व्यसनाधीन जरी हे नवरे
आपुले दुखणे आपुले चेहरे

जगण्यासाठी लढता लढता
बालपणातच थकले बाळ
जगले तर त्याच्या वाटेवर
पौगंडात निसरडी साल

दूरदेशिच्या रानामध्ये
आजारांशी झुंजत झुंजत
दारूसंगे झिंगत झिंगत
समस्यांची खोदत खाण
साधेभोळे आदीवासी
कवडीमोल तयांचे प्राण

गोंधळलेली बावरलेली
प्रवाहासवे आदळुन आपटुन
आता थोडे सावरलेली
तरुणाई शोधत वाटा
चाकोरिस देउन फाटाहे घरटे तर भरले गोकुळ
सर्वांचे अपुलेसे गोटुल
भव्यता नसे जिथे दिव्यता
माणूस जपणे हीच धन्यता

माणुस येथे कणाकणातुन
सर्व थरातुन सर्व कुळातुन
जो पिचलेला वा खचलेला
विठ्ठल तो सेवेस भुकेला

चौतिस वर्षे या घरट्याची
जित्या-जागत्या इतिहासाची
आणखी चौतिस घडो साधना
ईश्वरचरणी हीच प्रार्थना.


(ही कविता अम्मा-नायानांच्या लग्नाच्या चौतिसाव्या वाढदिवसानिमित्त केली आहे.)

  • निखिल अनिल जोशी
    गडचिरोली
    २ नोव्हेंबर, २०११

Wednesday, October 26, 2011

अर्धा ग्लास


बोलणारे बोलत राहतात
नागवा करून बटाट्याला
पुन्हा पुन्हा सोलत राहतात

सदान् कदा काहीतरी
उणे-दुणे काढत राहतील
ग्लास अर्धा भरला तरी
अर्धा रिता म्हणत राहतील
बोलणाऱ्यांचा काय कधी
ग्लास भरतो काठोकाठ?
उथळ पाण्यामध्येच होतो
बुडबुड्यांचा खळखळाट

अर्धा तुझा ग्लास आहे
तोच खूप खास आहे
वाटेवरती अंधाराच्या
उजेडाचा ध्यास आहे
हतबल हरल्या मनांसाठी
आशेचा सुवास आहे
उत्साहाचे प्रसन्न गाणे
सहज विनासायास आहे

आज नव्या वळणावर
निराशेच्या सरणावर
ही उगवेल प्रसन्न पहाट
काट्यांमधुनी पाउलवाट
वाट तुडव तू त्वेषाने
काटे काढुनि काट्याने
काट्यांची तुज नशा मिळो
स्वप्नांना अन् दिशा मिळो

- निखिल अनिल जोशी
    गडचिरोली  
  १७ ऑगस्ट, २०११

 
(ही कविता अमोल पाटील या मित्राच्या वाढ-दिवसानिमित्त केली होती. अमोल इलेक्ट्रिकल इंजीनियर होऊन जळगावच्या एम.एस..बी.त लागला. तिथल्या सुखासीन परिस्थितीत काम करणे त्याला मानवले नाही. जिथे शिक्षा म्हणून बदली होते, अशा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात त्याने बदली मागून घेतली. धानोरा तालुका पूर्णपणे गोंड आदिवासींचा असून जंगलात लपला असल्याने नक्षलग्रस्त आहे. तिकडे बऱ्याच गावांत अजून वीजच पोचली नाही. इतर अनेक गावांत लाईन असूनही २०-२० वर्षे दुरुस्ती न झाल्याने वीज नाही. ज्या गावात वीज आहे, तेथे लाईनवर जंगलातल्या फांद्या पडून नेहमी ब्रेकडाऊन होत असते. मग ते नक्की कुठे झालंय हे शोधत अमोल ५०-६० किमी गाडीवरून निर्मनुष्य जंगलातून रात्री-अपरात्री फिरतो. सोबत एखादा लाईनमन. १४ उपलब्ध जागांपैकी फक्त ३ लाईनमनच्या जागा भरलेल्या आहेत. या भागात कोणी यायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे. जे ३ लाईनमन आहेत, ते पार खचून दारूच्या आहारी गेले आहेत. त्यांची क्रयशक्ती शून्य आहे. मग contract basis वर गावातल्याच लोकांना कामगार म्हणून घेतले जाते. त्यांच्याकडून खूप काम करून घेतले जाते, पण पगार वेळेत मिळत नाही. मग त्यापायी अमोलची चिडचिड सुरू होते. वरिष्ठांकडे जावे तर ते देखील हतबल असतात व हात वर करतात. साध्या कामासाठी वारंवार दूरदूर चकरा माराव्या लागतात. सरकारी कारभारात कामे पुढे ढकलली जातात. मात्र मार्च जवळ आला की महावितरण खडबडून जागे होते. १००-१५० रुपयांच्या थकबाकीसाठी गरीब लोकांची वीज कापली जाते. त्याच वेळी मुंबईच्या मॉल्समध्ये विजेची उधळपट्टी सुरू असते. मग त्याला 'मी कोण?', 'मी हा आटापिटा कशासाठी करतोय?' असे अध्यात्मिक प्रश्न पडू लागतात.
अशा हतबल परिस्थितीत आम्ही त्याला फुकटचे सल्ले देण्याचे काम करतो, बऱ्याचदा शिव्या देतो. मात्र अखंड उत्साहाने त्याची धडपड सुरू असते. बरीच झटपट केल्यानंतर एखादे गाव प्रकाशमान होते. तेंव्हा त्याच्या डोळ्यांतला आनंद साऱ्या 'कां'ची उत्तरे देऊन जातो. झापून कामे होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या स्टाफसोबत मैत्री केली आहे. त्यांची दारू सुटावी म्हणून अखंड प्रयत्न करतोय. व्यसनमुक्त होण्यासाठी सर्चच्या व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन येतो. दारू पिऊन घरी पडण्यापेक्षा कमीत कमी ऑफिसमध्ये यावे म्हणून त्याने टीव्हीसेट आणला आहे, वॉलीबॉलचे कोर्ट बनवले आहे. अभिमानाने सांगता येईल असे एक तरी काम प्रत्येकाने दर आठवड्यात करावे असे त्यांना टारगेट दिले आहे. त्यांच्याबरोबर तो कोजागिरीसारखे सणदेखील साजरे करतो. आहे त्या कठीण परिस्थितीत काम पुढे कसे न्यावे हे तो रोज शिकत आहे. आज आपले गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी तिथल्या लोकांना हक्काचा अधिकारी मिळाला आहे. अपुरे मनुष्यबळ व साधनांसह तो जी झुंज देत आहे, त्यामुळे कोणती क्रांती झाली नसली तरी आजूबाजूच्या ३ लाईनमनच्या व पाच-पन्नास आदिवासींच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधानाचे हसू आहे. या लढाईसाठी त्याला वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा!)

Friday, July 22, 2011

मुक्त

आटपाट झाड होते, एक वडाचे म्हातारे
दाढी होती दाट त्याची, अन् डोक्यावर भारे

वाटसरूला सावली, मिळो पाखरा घरटे
उभे आशीर्वाद देत, उन्ह्सरींत एकटे

माया माऊलीची लावी, त्याची लेकरे पाखरं
पानाफांद्यांत घरटी, माती-मुळाशी भाकर

सायंकाळी पाखरांची, तेथे गाठभेट होई
कीलबीलाट करता, नभ निनादुन जाई

गुण्यागोविंदानं होतं सारं सुरळीत सुरू
कोणी लाविली नजर, वेडं जाहलं पाखरू

हाड तुटता जिभेचं, ताळतंत्र सोडूनिया
एकाएकी लागलं ते, वेडे त्वेषाने बोलाया

“वीट आला आहे मज, माझ्या विटाळ जिण्याचा
भोग भोगले कितीही, तरी ठाव न सुखाचा

दीसभर शोधूनिया, किडे-मकोडे मातित
जगू तरी कसे असे, घास घशात ओतीत

घाम गाळूनिया एक एक काटकी जोडणे
पण ओल पावसात, उन्हातान्हात भाजणे

पुरे झाली फरफट, आता घेईन भरारी
सोनियाच्या पिंजऱ्यात, कुण्या सधन महाली

पिंजऱ्यात सोनियाच्या, चैन चणे-फुटाण्याची
बंद खोलीत कसली, भिति ऊन-पावसाची

पारध्याच्या जाळ्यामध्ये, अडकवून घेईन
धनिकाच्या घरी मग, सून बनून जाईन"

क्षणभर कूजबूज, मग शांतता भयाण
पानांतूनी टपटप, आसू ढाळले वडानं

“दिल्या घरी रहा सुखी", वड बोलला क्लेशाने
जळे कापरे काळीज, खोलवरच्या खेदाने

*****************

मोठमोठ्या जखमांना, नामि औषध काळाचे
हळुहळू सावरले, नातलग पाखराचे

अचानक एके दिनी, थोडे चालत उडत
परतले पाखरू का, घरी रडत रडत

भाऊबंद जमा झाले, वड रोखुनी नजर
ऐकण्यास पाखराची, सारे कहाणी आतुर

“कसा पळ काढला मी, काय भोगल्या यातना
नका विचारू, काहीही बोलवेना साहवेना

चूक झाली मायबाप, जीवाभावाच्या सख्यांनो
मृगजळामागे आता, जाणे होणे न गड्यांनो

जिला माती म्हटले मी, माझ्यासाठी तेच मोती
गळणाऱ्या नभीच रे, फुले अभिमानी छाती

सोनपिंजरा नको तो, छाटे पंख जो मनाचे
प्रिय झोपडे वडाशी, देई स्वप्न गगनाचे

कशापायी भुललो मी, आज आरसा बघेन
ऋण फेडीन वडाचे, मग मातीत मिळेन"

वड पहाडाएवढा, गहीवरोनिया गेला
धीरगंभीर मार्दव, थोड्या प्रेमाने बोलला

“बाळा मिळते म्हणून, सदा मागत का जावे?
मातीमोल मोहापायी, कधी स्वतःला विकावे?

गगनाला गवसणी, घालण्याचा रे स्वभाव
तर हवी कशापायी, सोनपिंजऱ्याची हाव?

किडे-काटक्या वेचणे, तुझ्या जीवनाचे मर्म
हाच नाही का रे वेड्या, तुझ्या कूळाचा स्वधर्म?

जीवाच्याही खूप आधी त्याचा स्वधर्म जन्मतो
त्यागल्यासी कोरे गोटे, पाळल्यासी लेणी होतो

कधी होतो कोणी सुखी, सांग कर्तव्य टाकूनी?
मुक्तीपथ बहरतो, स्वधर्माचिये बंधनी ”

(प्रेरणा: मंगेश पाडगावकरांच्या पुढील ओळी-
'काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी
 भान राधिके नुरे ऐकताच बासरी
 बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा')


- निखिल अनिल जोशी
गडचिरोली
२२-७-२०११

Thursday, May 26, 2011

माझी पहिली प्रस्तावना

प्रस्तावना या शब्दाबद्दल मला लहानपणापासूनच विलक्षण कुतूहल आहे. कोणत्याही पुस्तकातील म्याटर वाचण्यापेक्षा मला त्याची प्रस्तावना वाचण्यासाठीच जास्त वेळ लागतो. किंबहुना प्रस्तावना वाचल्यानंतर माझा स्ट्यामिना, पेशन्स, विवेक, कुणीतरी डोस दिल्यानंतर पुस्तक मिळवून (बहुधा फुकटचे) वाचनाला सुरुवात करण्याचा उत्साह (एक पुस्तक वाचण्याची सुरुवात मी खूप वेळा करतो) किंवा आकलनशक्ती (जी महत्त्वाच्या वेळी हमखास दगा देते) यांपैकी काही तरी संपते. मग ते पुस्तक मला व मी पुस्तकाला 'गांधीगिरीने' समझोता करून त्रास देण्याचे टाळतो. "शो मस्ट गो ऑन" या कोण्या महापुरुषाने म्हटलेल्या उक्तीप्रमाणे मी नेहमीचे काम ("तुला काय काम असते" असा टोमणा मारून माझे मित्र त्यांचे जे काम मला देतात ते) करत राहतो, किंवा नवीन पुस्तकाची सुरुवात करतो. ते पुस्तकही (सोडलेले) आजोबांच्या बुक शेल्फ मध्ये मोठ्या डौलाने उभे असते. मग मित्राचा रागारागाने ते रिटर्न करण्यासाठी फोन आल्याशिवाय मला त्याची आठवण होत नाही. तर मुद्दा असा की प्रस्तावना हा माझा जिव्हाळ्याचा विषय. 'इलेक्ट्रोमॅग्नेटीक्स'च्या पुस्तकाच्या प्रस्तावनेचे परीक्षण करण्यातच सारा वेळ गेल्यामुळे माझा पहिला धडा सुरू करायचेच राहून गेले. त्यामुळे महत्प्रयासांनी (आणि पुणे विद्यापीठाच्या कृपेने) आतापर्यंत कशीबशी टाळलेली ए.टी.के.टी. अखेर मला बसलीच; याचे एकमेव कारण म्हणजे प्रस्तावना असे एक्स्पर्ट ओपिनिअन पडले (या एक्स्पर्ट पॅनल मध्ये मी व माझा के.टी. लागलेला दुसरा मित्र होतो.). पण मला त्याचा खेद नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे प्रस्तावना हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.

"स्वप्ने पहा" अशी शिकवण आपल्या पपू राष्ट्रपतींनी दिली आहे. लहानपणापासून अनेक स्वप्ने पाहिली. (आईच्या म्हणण्यानुसार त्यांना दिवास्वप्ने म्हणतात. परंतु चार अक्षरे लिहिण्यापेक्षा दोन अक्षरे लिहून आशय काळात असेल तर उगीच शाई का वाया घालावा? गेल्या चार परीक्षा व त्यांच्यामधल्या मिड-सेम एक्झाम्सना मिळून ही करंट रिफील पुरली असली तरी आता ती संपत आली आहे.) त्यातली काही स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत, तर बाकीच्यांचा मी नाद सोडून दिला. पण माझं एक जुनं स्वप्न की 'भले कादंबऱ्या, नाटके, कथा, कविता, व्यक्तीचित्रे अथवा प्रवासवर्णने लिहिता आली नाहीत तरी बेहत्तर, पण आयुष्यात एखादीतरी प्रस्तावना लिहिल्याशिवाय राहणार नाही. (कशाची ते अजून डीसाईड झालं नाही.)' पूर्ण करण्याचं मी तडकाफडकीने ठरवलं आहे. त्याला कारणंही तशीच आहेत.

अॅचिव्हमेंट्स, स्कॉलरशिप्स या सदरामध्ये (आता इंजीनियरिंगचे शेवटचे वर्ष आहे. नोकरीचे वेध लागलेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी बायोडाटा या प्रकारात स्वतःचे कौतुक प्रस्तुत सदराखाली करायचे असते. असो.) इयत्ता चौथीला केलेले वृक्षारोपण (त्यासाठी नाश्ता फ्री मिळणार होता. शिवाय शाळाही चुकणार होती.) आणि इयत्ता नववीला क्रांतिदिनाच्या दिवशी काढलेली प्रभात फेरी (ती रविवारी व पहाटे आठ वाजता असली तरी कंपल्सरी होती.) याखेरीज अथक परिश्रमांनंतरही काहीच बसले नाही. त्या सेक्शनमध्ये अॅडीशन करण्यास मी डेस्परेट आहे. (एक)
मिस. मधूला प्रपोज केल्यानंतर "ठरवलेली एक साधी गोष्ट करता येत नाही तर लग्नानंतर काय करणार? एनी वे, मी दुर्लक्षितांना पोसायचा मक्ता घेतला नाही." असे उत्तर देऊन नाकावर टिच्चून ती परागबरोबर निघून गेली व माझ्या निजलेल्या स्वाभिमानाने उचल खाल्ली. (दोन)
दुखावलेला स्वाभिमान हा जरी एक मोटिव्हेशन फॅक्टर असला तरी प्रस्तावना आत्ताच लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे सुरुवात न झालेल्या प्रोजेक्टचा प्रोजेक्ट रिपोर्ट दोन दिवसांत सबमिट करायचा आहे, आणि अशा क्रीटीकल वेळीच माणसाला किडे करायची हुक्की येते. (तीन)

तर मराठी वांङ्मयात अनमोल भर टाकण्याचे पवित्र कार्य हाती घेताना मी इन्स्पिरेशन सोर्स म्हणून पुलंचं गोळाबेरीज पॅडखाली घेतलं आहे. कोण जाणे एखाद्या सहृद प्रकाशकाने उद्या मानवतेच्या भावनेतून (किंवा वशिल्याने) माझे पुस्तक छापायचं ठरवलं तर प्रस्तावानेपासून तयारी करायला नको! (तशीही माझ्या पुस्तकाला माझ्याशिवाय कोण प्रस्तावना लिहिणार म्हणा. मीच नाव बदलून लिहीन म्हणतोय.) तूर्तास उत्तम प्रस्तावना देऊन प्रकाशकावर इम्प्रेशन कसे मारावे, शितावरून भाताची तशी प्रस्तावनेवरून पुस्तकाची परीक्षा कशी करावी ह्या टॉपिक्सना हात घालत नाही. (अन्यथा माझ्या पुस्तकातला एक चाप्टर फुकटचा कमी होईल.)

आणखी एक मला पडलेला यक्षप्रश्न म्हणजे कोणत्या नावाने लेखन करावे? एकटाच असल्यामुळे 'आग्रज' किंवा 'अनुज'ने संपणारी नावे ऑलरेडी बाद होतात. शिवाय बाबांनी मला वेळच्या वेळी मारून सुतासारखं सरळ केल्याने सुताने संपणारं नाव वापरण्याचं धाडस होत नाही. त्यामुळे 'केशवसुत'सम नावेही बाद होतात. मित्रांमधले माझे टोपणनाव पब्लिकली डिक्लेअर करण्यासारखं गोंडस नाही. म्हणून तूर्तास पाळण्यातल्या नावानेच लिहित आहे. (खरं सांगायचं तर दुसरं सुचलंच नाही.) आपल्या सूचना व प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत. स्तुतीपर प्रतिक्रिया भावी पुस्तकात छापून आणण्याची मी हमी देत आहे. स्तुती करणाऱ्या लकी वाचकाला पुस्तकाची एक प्रत फ्री मिळेल याची ग्वाही देतो आणि प्रस्तावना सुरू करतो.

लोभ असावा.

आपला नम्र,

निखिल अनिल जोशी
८-१०-२००६
पुणे

Thursday, May 19, 2011

गर्वहरण

कालपटाच्या पत्रिकेत आज शनी दाटला होता
आजचा दिवस जरा ग्रीष्माने ग्रासला होता

का कोणास ठाऊक,
पण पहाटेचा प्रसन्न भास्कर आज जरा जास्तच गडद दिसला होता
इतक्या दिवसांचा अहंकार का वळीवाच्या चाहूलीने त्रासला होता?

त्याला वेळेचेही भान नव्हते, अन् दयेला तर मुळीच स्थान नव्हते
रक्ताचा श्वेत अन् श्वेताचा पीत कधी झाला ते कळलेच नाही
सर्वांना तडपवताना स्वतःही जळतोय हे तर त्याला वळलेच नाही

धरादेखील त्याच्या ह्या वागण्याने त्रस्त होत होती
रक्ताला जागून मात्र त्याच्याबरोबर हतबलपणे तप्त होत होती

पण त्याला त्याची पर्वा नव्हती, त्याचे पित्त खवळले होते
गर्वाने मान काढली होती, अन् अहंकारी रक्त उसळले होते

कवितेत शोभणारे त्याचे प्रखर तेज आता 'काटे'कोरपणे टोचू लागले होते
क्षणागणिक वाढणारे त्याचे भीषण तांडव बेधुंद होऊन नाचू लागले होते

नारायणच जर उग्र असे तर व्यथा कुणाला सांगावी?
बिथरलेल्या मांजराच्या गळ्यात घंटा कशी बांधावी?

...

कोण जाणे क्षितीजातून ते दैवी ढग कसे आले
धगधगत्या त्या बाणांचे मग क्षणात कवडसे कसे झाले?

मेघांतून जलधाराही झिरपू लागल्या, दोघांचे अहंकार एकमेकांना भेटले
क्षणभर इंद्रधनुष्याचा भास, नंतर मात्र धर्मयुद्ध पेटले

अहो अस्तित्वाची लढाई ती, मागे कुणीच सरेना
त्यांचा सुरू झाला लपंडाव, बिचाऱ्या नभाला मात्र वाली मिळेना

इतका वेळ दबा धरून बसलेली चपला गर्जना करीत मेघाला मिळाली
संध्याकाळच्या सूर्याच्या ओसरत्या तेजाचीही आयतीच मदत त्याला झाली

मेघाची सरशी मान्य करण्याखेरीज सूर्याकडे काही गत्यंतरच नव्हते
पांढरं निशाण दाखवावं तर ढगांमध्येही अंतर नव्हते

.......

एका यःकश्चित सायंकाळी निसर्गाला अशी महाकाव्ये स्फुरतात
भल्याभल्या महाभूतांचीही तेंव्हा सहज गर्वहरणे घडतात


-निखिल अनिल जोशी
२००६
पुणे

कोप

आयुष्याच्या माझ्या रणि, सर्व पापांचा मी धनी
कधी काही होते माझे, आता फक्त आठवण

बेभान हा धुंद वारा, वादळाचा हा नजारा
धन गेले मन मेले, नुरे आशेचा किरण

भूकंपाचा अनुकंपा, विनाशाचा वाजे डंका
वाट झाली वाकडी नि रेंगाळले दोन क्षण

त्सुनामीची उंच झेप, निसर्गाचा हा उद्रेक
शान मातीमोल झाली, जीव फिरे रानरान

निसर्गाचा कोप झाला, आयुष्यावर रोष झाला
चूल मूल सर्व गेले, भटकंती वणवण

कोणाविन कोण अडे, रोज मरे कोण रडे
आता नाही घरदार, शोधतो विसावा पण


-निखिल अनिल जोशी
१६-०३-२००५
पुणे

Tuesday, March 15, 2011

उनाड रात्र जत्रेची

शोधग्रामाच्या आदिवासी जत्रेत 'चहा, नाश्ता, जेवण वाटप समिती'चा प्रमुख या नात्याने खूप काम करून रात्री दहाला परतलो तेव्हा धन्य धन्य वाटत होते. चार-सहा गोंडी भाषेतले नवे शब्द शिकलो; अजिबात न दमता, काहीच तक्रार न करता प्रचंड काम केलं याचं मनापासून समाधान वाटत होतं. पण आता मात्र खूप थकवा जाणवत होता. कमीत कमी पाठ टेकू शकेल एवढ्या जागेचा डोळे मनापासून शोध घेत होते. कॉट तर दिसली, पण तिच्यावर झोपण्यासाठी सारा पसारा उकरून काढावा लागणार होता. शेवटी मनाचा हिय्या करून कॉटवरचा ढीगारा जसाच्या तसा उचलून खुर्चीत टाकला, त्यातून उशी शोधून डोक्याशी ठेवली, आधीच विस्कटलेली चादर नीट झटकून घेतली, सकाळी ६.३० ला उठण्यासाठी एक आलार्म आणि तीन रिमाईंडर्स लावले, आता दिवे बंद करणार एवढ्यात तुषार भाऊंचा फोन आला. 'फुलबोडीची ३०- ३५ माणसं जेवायला येत आहेत, ताबडतोब मेसमध्ये वाढायला ये.' कसची झोप आणि कसचं काय. हातातली झटकलेली चादर विस्कटून मी पुन्हा मेसला गेलो.

मेसमध्ये जाउन पाहतोय तर निर्वाणीची परिस्थिती! आता कोणी जेवायला येत नाही म्हणून विमल ताईंनी सगळी उरलेली भाजी टाकून दिली होती. दिवसभर स्वयंपाक करून त्याही वैतागल्या होत्या. ती परिस्थिती पाहून मी निर्णय घेतला, 'त्यांना पुन्हा स्वयंपाक करायला लावायचा नाही.' उरलेलं वरण आणि उरलेला भात ३५ जणांना सहज पुरेल असा माझा अंदाज होता.

"हॅत, एवढं वरण पाच जणाना बी न्हाई पुरून राह्यलं. आनि पाव्हन्यांना काय असलं मुळमुळीत खायला घालातो का भाऊ? ते काही नाही, विमल, बेसन बनव." - कौसाल्याताई

एका वाक्यात त्यांनी माझ्या कॉमन सेन्सचे पार धिंडवडे उडवून टाकले. नुसतं बोलून त्या थांबल्या नाहीत तर टमाटे, कांदे चिरायला घेतले, बेसन भिजवलं. एका चुलीवर बेसन बनवण्याचा प्रोग्राम सुरू झाला. भात पण कमी पडेल असं वाटलं (Of course त्यांनाच), म्हणून दुसरी चूल पेटवून त्यावर भात शिजवायचं ठरलं. सगळेच काम करत होते आणि मी ढीम्मपणे पाहत उभा होतो. मलाच माझी लाज वाटली. मी चूल पेटवण्यासाठी आगकाडी शोधायचे ठरवले.

“आगकाडी काह्यले शोधून राहिला भाऊ? त्या बेसनाच्या चुलीत लाकडं जळून राहिली ना, त्यातलंच उचल येक आणि पेटव दुसरी चूल.” - परत कौसल्याताई. परत माझ्या कॉमन सेन्सच्या पार चिंध्या चिंध्या.

हा सगळा प्रकार सुरू असताना अचानक फुलबोडीची ३५-४० मंडळी दत्त म्हणून समोर उभी ठाकली. अजून बेसनचा काहीच पत्ता नव्हता.

“आल्याआल्या काह्यले जेवन करून राह्यले? एक मस्त ढोल प्रोग्राम होऊन जाऊ द्यात. मी आलोच कॅमेरा घेऊन." तुषार भाउंनी त्यांना कॅमेराचं अमिष दाखवून नाचायला पाठवलं आणि कशीबशी वेळ मारून नेली.

परिस्थिती मोठी आणीबाणीची! मी परत आपलं डोकं लावलं. म्हटलं बेसन-भात होईपर्यंत पत्रावळ्या मांडून ठेवू, म्हणजे स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच वाढता येईल. मी पत्रावळ्या मांडायला सुरुवात केली.

“ए भाऊ, तुले काय समजतं की नाय? पत्रावळ्या लावून ठेवलेस तर लोक जेवायला येणार न्हाईत का? अजून बेसन बनायले बहु टाईम हाय. इतग्यात नको लाऊ.” - परत कौसल्याताई. मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. मी मोठं डोकं लावून काहीतरी innovative करावं आणि ६वी यत्ता शिकलेल्या बाईने ते वारंवार चूक सिद्ध करावं! मला माझ्यावरच हसू यायला लागले.

“ए भाऊ, तू काह्यले काम करून राह्यला? गप बस ना येथी. काम करायला आम्ही हौ ना?” कौसल्या ताईनी मला बसवलं आणि माझी ragging घ्यायला सुरुवात केली. “जत्रेमधी पोट्टी बघायची का तुले?” कौसल्या ताईंसोबत आनंद काका, सुजाता ताई, विमल ताई यांनीही माझी बिनपाण्याची सुरू केली. तेवढ्यात फुलबोडीची काही मंडळी चुलीवर ढोल गरम करायला व मांजऱ्याला भात लावण्यासाठी आली आणि मी सुटलो.

भात-बेसन झाले तोपर्यंत फुलबोडीच्या मंडळींचा रेला नाच ऐन रंगात आला होता. 'आता डानस संपल्याशिवाय कसचे जेवायला येतात' म्हणून आमची मंडळी त्यांचा 'डानस' पहायला गेली.

ही आदिवासी मंडळी पण मोठी दर्दी. पोटात अन्नाचा एक कण नसतानाही रात्र रात्र सहज नाचून काढतील. फक्त तरुणच नाही तर म्हाताऱ्या बाया आणि पोरंसुद्धा. त्यांच्या डान्समध्ये हळुहळू मी कसा विरघळत गेलो ते माझे मलाच कळले नाही. ती मंडळी उपाशी पोटी बेधुंदपणे, पण खूप सुंदर, तालबद्ध नाचत होती. सर्व अशिक्षित स्त्रिया पुरूष एकमेकांच्या हातात हात घालून आमच्यासमोर मोकळेपणाने नाचत होते. त्यांच्या मनात कोणतीही 'सुशिक्षित' भीड नव्हती. सर्वांनी एकमेकांचे हात धरून गोल केला होता. मध्ये मांजऱ्या व ढोल वाजवणारे होते. त्यांनी असा काही ठेका धरला होता की एखाद्या लंगड्यालाही नाचण्याची उर्मी यावी. फक्त पुढेमागे करताकरता त्यांची पावले इतकी सुंदर, सफ़ाईदारपणे थिरकत होती की एखाद्या सुप्रसिद्ध नृत्यांगनेलाही त्यांचा हेवा वाटावा. नाचता नाचता त्यांचे तार साप्तकातले, पण तरीही गोड वाटेल असं संथ, एकसुरात गाणं सुरू होतं. त्यांच्यातल्या सामान्यातल्या सामान्य स्त्री-पुरुषांना सूर-तालाचे असामान्य जन्मजात ज्ञान होतं. कितीही जवळून निरीक्षण केले, त्यांच्या स्टेप्सना मात्रांच्या हिशोबात बसवण्याचा प्रयत्न केला, पण मला मात्र ते त्यांच्यासारखं नाचायला जमेना. माझ्यासारख्या शहऱ्याला जे मिळवण्यासाठी कित्येक वर्षांची तपश्चर्या कारावी लागेल, ते त्यांना आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. आपल्या कलेचा त्यांना कसलाही गर्व नव्हता. जत्रेत नाचून त्यांना एक दमडीही मिळणार नव्हती, पण नाचता नाचता ते लाखमोलाचा आनंद लुटत होते.

सर्व काही असं सुरळीत सुरू असताना अचानक एक मांजरीवाला गोलातून बाहेर आला. त्याने हळूच मांजरी उतरवली. झटका आल्यासारखे केले आणि आपला शर्ट फाडून टाकला. त्याने लोटांगण घातले आणि त्याच अवस्थेत नाचणाऱ्या मंडळींभोवती तो गोल फिरू लागला, उड्या मारू लागला, इकडेतिकडे सैरभैर पळू लागला आणि मग मॉं दंतेश्वरीच्या देवळात निघून गेला. मी स्तब्ध झालो. काय चाललंय ते मला काहीच कळेना. पण मंडळी जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात नाचत होती. काही कौतुकाने त्याच्याकडे बघत होती. थोडीफार चौकशी केल्यावर कळलं की तो एक पुजारी असून त्याच्या अंगात नाचता नाचता देव आला होता. त्याचे जे चाळे चालले होते ते तो करत नसून त्याच्यामधला देव करत होता. आता तो लोखंडी सळीने स्वतःला टोचूनही घेणार होता, रक्तबंबाळही होणार होता, झाडांवरही चढणार होता; पण एवढं करूनही काही वेदना झाल्या तर त्या त्याला होणार नव्हत्या, तर त्याच्यातल्या देवाला होणार होत्या. त्यामुळे त्याच्या बेबंदशाहीला कोणताच लगाम नव्हता. थोड्या वेळाने त्याच्यातला देव उतरून हळुहळू बाकीच्या नाचणाऱ्या पुजाऱ्यांच्या अंगातही शिरणार होता. शेवटच्या पुजाऱ्यातला शेवटचा देव उतरेपर्यंत मंडळी नाचणार होती.

या सर्व गदारोळात ज्यासाठी सर्व अट्टाहास केला होता ते भात-बेसन मात्र मंडळीची वाट बघत हळुहळू थंड होत होतं. अंगातला देव गेल्याशिवाय मंडळी भात-बेसनाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत हे लक्षात आल्यावर मी हळूच तेथून काढता पाय घेतला. घरी जाऊन पडलो तरी खूप वेळ कानामध्ये ढोल-मांजरीचे आवाज घुमत होते.


निखिल अनिल जोशी
गडचिरोली
१०-३-२०११

Monday, February 28, 2011

भिंत

मिळण्यासि ज्ञानसागरा, माझी नदी निघाली
अडलीस का बिचारे, धरणात तू अकाली

तुज गर्व 'जरि अडखळले, खळखळेन वाहुन वेगे'
सांगता तुझ्या स्वप्नांची का दल्दलिच्या चिखला खाली

विजयाची तुझी पताका, क्षितिजावर झळकवण्याची
भिंतीस पाहुनी का ग, उर्मी अशी गळाली

तुज तहानल्या बाळांना, जीवने द्यायची होती
निष्पाप जंगले का ग, पाण्यामध्ये बुडाली

जी पुरात हरवुन जातिल, ती नको आसवे ढाळू
चल बंड करूया वेडे, संघर्षच तुझ्या कपाळी

तो अथांग सागर अजुनी, तुज खुणावतो ग आहे
भिंतीस फोडण्या आता, परिपक्व वेळ ही झाली


-निखिल अनिल जोशी
२८-०२-२०११
गडचिरोली

Monday, February 14, 2011

ती होती संध्या मधुरा

लहानपणी शाळेतून आल्यावर गॅलरीत उभा रहायचो.
तेंव्हा रोज भेटायची मला सूर्य हाकणारी संध्या.
तो आज्ञाधारक सूर्य मग तिला पोहोचवायचा क्षितिजापर्यंत.
अगदी मोहोरून जायचा नभाने आच्छादलेला आणि क्षितिजापर्यंत विस्फारलेला घरामागचा माळ.
माळाचा थाट काय सांगावा!
काही गर्द झाडे आणि खूप सारी झुडुपे
मातीची अब्रू झाकणारे गवत, काहीसे हिरवे, काहीसे पिवळे.
ऑर्केस्ट्राचा प्रमुख वारा, त्याचे संकेत ओळखायचा तिथला निसर्ग.
मग पाने डोलायची वाऱ्याच्या तालावर.
निर्जीव पाचोळा, तोदेखील उडायचा वाऱ्याचे मंत्र ऐकून.
पिकल्या फळांची मात्र जाम फजिती व्हायची.
ती पाहून खळखळून हसायचा माळामधून वाहणारा ओढा.
या मैफिलीत मग षड्ज लावायची पाखरे.
माणसाच्या बेसूर रडगाण्यांना येथे मुळीच स्थान नव्हते.
एखाद्या वेड्या कवीला किंवा चित्रकाराला मात्र दुरून ऐकायची मुभा होती.

दिवस असेच जाऊ लागले.
माझी समज वाढत गेली.
बालपण मात्र कमी होत गेलं.

गॅलरीत उभा रहायला मला आता क्वचितच मिळायचा वेळ.
फिरायला गेलो तर क्षितिजापर्यंत पसरलेला माळ आता पूर्वीपेक्षा लवकर फिरून व्हायचा.
मी विचार केला, 'मोठा झालोय.
कदाचित पावले झाली असतील मोठी किंवा कदाचित वाढली असेल पावलांची गती.
कदाचित सळसळणाऱ्या रक्ताबरोबर आली असेल क्षितीज सर् करायची उर्मी.'

आता गॅलरीमध्ये घुमणारा पाखरांचा आवाज पूर्वीपेक्षा मोठ्याने घुमायचा.
मी विचार केला, 'मोठा झालोय.
झाल्या असतील इतक्या वर्षांत रेशीमगाठी घट्ट.
कदाचित पाखरांनाही कळली असेल आपली वेडी माया,
आणि निर्भयपणे वावरू लागली असतील आपल्या घराजवळ.'

दिवस जात होते.
मी मोठा होत होतो.
माळ खूपच कमी वेळेत तुडवून व्हायचा.
आणि गॅलरीमध्ये घुमणारा पाखरांचा आवाज थोडा मोठ्यानेच घुमायचा.

एके दिवशी मी फार मोठा झालो.
स्वप्नांचे मजले बांधत बांधत मी इंजिनियर झालो.
आता मी लोकांची घरे बांधणार होतो.
अपार्टमेंट, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स बांधणार होतो.
माझा आनंद गगनात मावेना.

का कोणास ठाऊक, मला अचानक जुनी गॅलरी आठवली.
वाटले, पाखरे एव्हाना निर्भयपणे बागडू लागली असतील घरात.
त्यांना सांगावा आपला आनंद,
आणि कराव्यात चार खुशालीच्या गोष्टी.
गॅलरीत गेलो.
का कोण जाणे, आज तिकडे सुतकी शुकशुकाट होता.
ती भयाण शांतता क्षणाक्षणाला माझा जीव घेत होती.
म्हटलं, आपल्या आवडत्या माळावर फिरायला जाऊ.
कमी वेळेत का होईना, पण आख्खा माळ तुडवून येऊ.
खाली गेलो तर माळही गायब!

आत्तापर्यंत व्हेज खाणारे पाहिले होते, नॉन-व्हेज खाणारे पाहिले होते.
पण या सिमेंटच्या जंगलाने आख्खा माळच्या माळ गिळून टाकला होता.

ती डुलणारी पाने, उडणारा पाचोळा, गाणारी पाखरं, खळखळून हसणारा ओढा...
कुठे गेले हे सगळे?
मला तर फक्त अपार्टमेंट्स, शॉपिंग मॉल्स, मल्टीप्लेक्सेस दिसतायत!

आजही मला सूर्य हाकणारी संध्या भेटते.
पण तो व्यवहारी सूर्य आता तिला क्षितिजापर्यंत पोहोचवत नाही,
एका उंच अपार्टमेंटच्या मागेच सोडून देतो.


- निखिल अनिल जोशी
४-४-२००९
कानपूर

माझिया मना

हे अनाम भय मज वाटत जाते

काचेमधुनी दृश्य पाहता मला भासतो तो आरसा
लोपुनि सुंदरता मज दिसती हेवे दावे आस तृषा
प्रतिमा माझ्या मला हिणवुनी, कटाक्ष अन तो क्रूर टाकुनी
खचलेल्या गर्वाला हरूनी, सद्सद्बुद्धीला अन छळुनी
फस्त गुणांची गुणी गुणसूत्रे, भरती अवगुण दाही दिशा
पापभीरू मन केविलवाणे बावरते मग दिनी निशा

अनाहूतशी चपलकल्पना मना कापऱ्या कापत जाते
स्वतःच निर्मित काळे चेटुक मनी भाबड्या दाटत जाते
हे अनाम भय मज वाटत जाते


कुण्या पाखरा उडता पाहून मला पिंजरा आठवतो
खडकावरला नाजूक अंकुर खडकावर मी गोठवतो
चंद्रतारका सर्वच मृगजळ, भोवतालचा तिमिर खरा
रखरखते जणू बाण उन्हाचे, सूर्याची ही अजब तऱ्हा
सरितेचि ति अनंत वळणे, सागरजल अन खारे खाष्ठ
आम्र मौसमी, द्राक्षे आंबट, माडाची अन् उंचिच जास्त


निसर्गनिर्मित चित्रहि मजला व्यंगचित्र जणु भासत जाते
खचूनी अर्धमेला मी मग लज्जा उरले मारत जाते
कर्म कफल्लक माझे मन मग शर्वीलकहि वाटत जाते
हे अनाम भय मज वाटत जातेनिराशा मनासी विनाशास वाहे
नसे ती अपत्ती अगंतूक पाहे
पहाटे क्षणार्धात स्वप्नी अभद्री
मुहूर्तास लग्नात कोणी मरावे

बही शूरवीरे नि आतून भित्रे
उपस्थित संदेह चित्रेविचित्रे
मनातील विश्वासही गोठलेला
असे द्रव्य दारी तरीही भुकेला

म्हणोनी निराशेस त्यागोनि द्यावे
सदा गूण्गुणोनी नवे गीत गावे
मनी आत्मविश्वास चिंतीत जावा
मना सज्जना मार्ग हा तू धरावा


-निखिल अनिल जोशी
पुणे
२००६