Tuesday, March 15, 2011

उनाड रात्र जत्रेची

शोधग्रामाच्या आदिवासी जत्रेत 'चहा, नाश्ता, जेवण वाटप समिती'चा प्रमुख या नात्याने खूप काम करून रात्री दहाला परतलो तेव्हा धन्य धन्य वाटत होते. चार-सहा गोंडी भाषेतले नवे शब्द शिकलो; अजिबात न दमता, काहीच तक्रार न करता प्रचंड काम केलं याचं मनापासून समाधान वाटत होतं. पण आता मात्र खूप थकवा जाणवत होता. कमीत कमी पाठ टेकू शकेल एवढ्या जागेचा डोळे मनापासून शोध घेत होते. कॉट तर दिसली, पण तिच्यावर झोपण्यासाठी सारा पसारा उकरून काढावा लागणार होता. शेवटी मनाचा हिय्या करून कॉटवरचा ढीगारा जसाच्या तसा उचलून खुर्चीत टाकला, त्यातून उशी शोधून डोक्याशी ठेवली, आधीच विस्कटलेली चादर नीट झटकून घेतली, सकाळी ६.३० ला उठण्यासाठी एक आलार्म आणि तीन रिमाईंडर्स लावले, आता दिवे बंद करणार एवढ्यात तुषार भाऊंचा फोन आला. 'फुलबोडीची ३०- ३५ माणसं जेवायला येत आहेत, ताबडतोब मेसमध्ये वाढायला ये.' कसची झोप आणि कसचं काय. हातातली झटकलेली चादर विस्कटून मी पुन्हा मेसला गेलो.

मेसमध्ये जाउन पाहतोय तर निर्वाणीची परिस्थिती! आता कोणी जेवायला येत नाही म्हणून विमल ताईंनी सगळी उरलेली भाजी टाकून दिली होती. दिवसभर स्वयंपाक करून त्याही वैतागल्या होत्या. ती परिस्थिती पाहून मी निर्णय घेतला, 'त्यांना पुन्हा स्वयंपाक करायला लावायचा नाही.' उरलेलं वरण आणि उरलेला भात ३५ जणांना सहज पुरेल असा माझा अंदाज होता.

"हॅत, एवढं वरण पाच जणाना बी न्हाई पुरून राह्यलं. आनि पाव्हन्यांना काय असलं मुळमुळीत खायला घालातो का भाऊ? ते काही नाही, विमल, बेसन बनव." - कौसाल्याताई

एका वाक्यात त्यांनी माझ्या कॉमन सेन्सचे पार धिंडवडे उडवून टाकले. नुसतं बोलून त्या थांबल्या नाहीत तर टमाटे, कांदे चिरायला घेतले, बेसन भिजवलं. एका चुलीवर बेसन बनवण्याचा प्रोग्राम सुरू झाला. भात पण कमी पडेल असं वाटलं (Of course त्यांनाच), म्हणून दुसरी चूल पेटवून त्यावर भात शिजवायचं ठरलं. सगळेच काम करत होते आणि मी ढीम्मपणे पाहत उभा होतो. मलाच माझी लाज वाटली. मी चूल पेटवण्यासाठी आगकाडी शोधायचे ठरवले.

“आगकाडी काह्यले शोधून राहिला भाऊ? त्या बेसनाच्या चुलीत लाकडं जळून राहिली ना, त्यातलंच उचल येक आणि पेटव दुसरी चूल.” - परत कौसल्याताई. परत माझ्या कॉमन सेन्सच्या पार चिंध्या चिंध्या.

हा सगळा प्रकार सुरू असताना अचानक फुलबोडीची ३५-४० मंडळी दत्त म्हणून समोर उभी ठाकली. अजून बेसनचा काहीच पत्ता नव्हता.

“आल्याआल्या काह्यले जेवन करून राह्यले? एक मस्त ढोल प्रोग्राम होऊन जाऊ द्यात. मी आलोच कॅमेरा घेऊन." तुषार भाउंनी त्यांना कॅमेराचं अमिष दाखवून नाचायला पाठवलं आणि कशीबशी वेळ मारून नेली.

परिस्थिती मोठी आणीबाणीची! मी परत आपलं डोकं लावलं. म्हटलं बेसन-भात होईपर्यंत पत्रावळ्या मांडून ठेवू, म्हणजे स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच वाढता येईल. मी पत्रावळ्या मांडायला सुरुवात केली.

“ए भाऊ, तुले काय समजतं की नाय? पत्रावळ्या लावून ठेवलेस तर लोक जेवायला येणार न्हाईत का? अजून बेसन बनायले बहु टाईम हाय. इतग्यात नको लाऊ.” - परत कौसल्याताई. मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. मी मोठं डोकं लावून काहीतरी innovative करावं आणि ६वी यत्ता शिकलेल्या बाईने ते वारंवार चूक सिद्ध करावं! मला माझ्यावरच हसू यायला लागले.

“ए भाऊ, तू काह्यले काम करून राह्यला? गप बस ना येथी. काम करायला आम्ही हौ ना?” कौसल्या ताईनी मला बसवलं आणि माझी ragging घ्यायला सुरुवात केली. “जत्रेमधी पोट्टी बघायची का तुले?” कौसल्या ताईंसोबत आनंद काका, सुजाता ताई, विमल ताई यांनीही माझी बिनपाण्याची सुरू केली. तेवढ्यात फुलबोडीची काही मंडळी चुलीवर ढोल गरम करायला व मांजऱ्याला भात लावण्यासाठी आली आणि मी सुटलो.

भात-बेसन झाले तोपर्यंत फुलबोडीच्या मंडळींचा रेला नाच ऐन रंगात आला होता. 'आता डानस संपल्याशिवाय कसचे जेवायला येतात' म्हणून आमची मंडळी त्यांचा 'डानस' पहायला गेली.

ही आदिवासी मंडळी पण मोठी दर्दी. पोटात अन्नाचा एक कण नसतानाही रात्र रात्र सहज नाचून काढतील. फक्त तरुणच नाही तर म्हाताऱ्या बाया आणि पोरंसुद्धा. त्यांच्या डान्समध्ये हळुहळू मी कसा विरघळत गेलो ते माझे मलाच कळले नाही. ती मंडळी उपाशी पोटी बेधुंदपणे, पण खूप सुंदर, तालबद्ध नाचत होती. सर्व अशिक्षित स्त्रिया पुरूष एकमेकांच्या हातात हात घालून आमच्यासमोर मोकळेपणाने नाचत होते. त्यांच्या मनात कोणतीही 'सुशिक्षित' भीड नव्हती. सर्वांनी एकमेकांचे हात धरून गोल केला होता. मध्ये मांजऱ्या व ढोल वाजवणारे होते. त्यांनी असा काही ठेका धरला होता की एखाद्या लंगड्यालाही नाचण्याची उर्मी यावी. फक्त पुढेमागे करताकरता त्यांची पावले इतकी सुंदर, सफ़ाईदारपणे थिरकत होती की एखाद्या सुप्रसिद्ध नृत्यांगनेलाही त्यांचा हेवा वाटावा. नाचता नाचता त्यांचे तार साप्तकातले, पण तरीही गोड वाटेल असं संथ, एकसुरात गाणं सुरू होतं. त्यांच्यातल्या सामान्यातल्या सामान्य स्त्री-पुरुषांना सूर-तालाचे असामान्य जन्मजात ज्ञान होतं. कितीही जवळून निरीक्षण केले, त्यांच्या स्टेप्सना मात्रांच्या हिशोबात बसवण्याचा प्रयत्न केला, पण मला मात्र ते त्यांच्यासारखं नाचायला जमेना. माझ्यासारख्या शहऱ्याला जे मिळवण्यासाठी कित्येक वर्षांची तपश्चर्या कारावी लागेल, ते त्यांना आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. आपल्या कलेचा त्यांना कसलाही गर्व नव्हता. जत्रेत नाचून त्यांना एक दमडीही मिळणार नव्हती, पण नाचता नाचता ते लाखमोलाचा आनंद लुटत होते.

सर्व काही असं सुरळीत सुरू असताना अचानक एक मांजरीवाला गोलातून बाहेर आला. त्याने हळूच मांजरी उतरवली. झटका आल्यासारखे केले आणि आपला शर्ट फाडून टाकला. त्याने लोटांगण घातले आणि त्याच अवस्थेत नाचणाऱ्या मंडळींभोवती तो गोल फिरू लागला, उड्या मारू लागला, इकडेतिकडे सैरभैर पळू लागला आणि मग मॉं दंतेश्वरीच्या देवळात निघून गेला. मी स्तब्ध झालो. काय चाललंय ते मला काहीच कळेना. पण मंडळी जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात नाचत होती. काही कौतुकाने त्याच्याकडे बघत होती. थोडीफार चौकशी केल्यावर कळलं की तो एक पुजारी असून त्याच्या अंगात नाचता नाचता देव आला होता. त्याचे जे चाळे चालले होते ते तो करत नसून त्याच्यामधला देव करत होता. आता तो लोखंडी सळीने स्वतःला टोचूनही घेणार होता, रक्तबंबाळही होणार होता, झाडांवरही चढणार होता; पण एवढं करूनही काही वेदना झाल्या तर त्या त्याला होणार नव्हत्या, तर त्याच्यातल्या देवाला होणार होत्या. त्यामुळे त्याच्या बेबंदशाहीला कोणताच लगाम नव्हता. थोड्या वेळाने त्याच्यातला देव उतरून हळुहळू बाकीच्या नाचणाऱ्या पुजाऱ्यांच्या अंगातही शिरणार होता. शेवटच्या पुजाऱ्यातला शेवटचा देव उतरेपर्यंत मंडळी नाचणार होती.

या सर्व गदारोळात ज्यासाठी सर्व अट्टाहास केला होता ते भात-बेसन मात्र मंडळीची वाट बघत हळुहळू थंड होत होतं. अंगातला देव गेल्याशिवाय मंडळी भात-बेसनाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत हे लक्षात आल्यावर मी हळूच तेथून काढता पाय घेतला. घरी जाऊन पडलो तरी खूप वेळ कानामध्ये ढोल-मांजरीचे आवाज घुमत होते.


निखिल अनिल जोशी
गडचिरोली
१०-३-२०११