Sunday, December 4, 2011

शोध स्वतःचा


सिकंदराबादला चंद्रपूरकडे जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेस मध्ये मी एकदाचा बसलो, मगच मला विश्वास वाटू लागला की आपण शोधग्राम, गडचिरोलीला जात आहोत. खूप हायसं वाटलं. दोन दिवस का होईना पण मी त्या अंधाऱ्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर डोकं गहाण ठेऊन बसणार नव्हतो. धूरामधून मार्ग काढत सिमेंटच्या जंगलात स्वतःचाच कधीपासून हरवलेला पत्ता शोधत भटकणार नव्हतो. दोन दिवस मी यंत्रमानवांपासून दूर खरोखरच्या माणसांमध्ये मिसळून जाण्यासाठी निघालो होतो. ट्रेनचा भोंगा वाजला आणि मी माझ्या बंदिस्त विश्वात उसना का होईना पण मोकळा श्वास घेतला.

सकाळी साडेपाचला आगगाडीने मराठी मातीत प्रवेश केला. छाती भरून आल्यासारखं वाटलं. २१ वर्षे महाराष्ट्रात होतो तेंव्हा किंमत कळली नाही, पण दोन वर्षं कानपूर व एक वर्ष हैदराबादला राहून चांगलाच वठणीवर आलो होतो. चंद्रपूरला उतरून गडचिरोलीला जाणाऱ्या लाल-पिवळ्या एस.टी.त बसलो. काही गोष्टी या आपल्या खास मर्मबंधातल्या ठेवी असतात. एस.टी. ही त्यांपैकीच एक. मला उगीचच 'बालपण गमले मजला असे काहीसे वाटून गेले. असो.

चंद्रपूर सोडले. पाच मिनिटातच मी पहिली पाटी वाचली, 'सावधान! वाघ-बिबट्यांचा वावर'. अचानक लक्षात आले, अरेच्या, असेही प्राणी निसर्गात असतात हे मी विसरूनच गेलो होतो. नाही तर आमचा वाघाशी संबंध म्हणजे IPL च्या ब्रेक मध्ये ढोणीची 'Save the tiger' ची जाहिरात लागते तेवढाच. मला इकडच्या लोकांचा खूप हेवा वाटला. लगेचच पानगळीचे पण घनदाट जंगल सुरू झाले. अहो उघडी-नागडी, बेअब्रू झालेली जमीन कुठेच दिसेना. जिकडे तिकडे या प्रदेशाची श्रीमंती दाखवणारे पाचोळ्याचे अच्छादन! चैत्र जवळ येऊ घातला होता. पानगळीच्या झाडांना पालवीचे दागिने फुटण्यास प्रारंभ झाला होता. हे दागिने सूर्यकिरणांची पहिली तिरीप पडून खूपच उठून दिसत होते. वसंताची चाहूल लागून फुललेल्या फुलोऱ्यामुळे जंगल रंगीबेरंगी व मोहक वाटत होते.

वाटेत गावांची नावे पण किती सुंदर! मुल, सावली, व्याहाड! अशी काही गावे गेल्यानंतर मध्येच एस.टी.तल्या एका बाळाला शू लागली. त्यासाठी खास आमच्या बसने स्टॉप घेतला. आई बाळाला घेऊन खाली उतरली. बाकीचे प्याशिंजर खिडकीतून 'श्शsss श्शsss' करत बाळाला प्रोत्साहन देऊ लागले. उत्साहाच्या भरात बाळाने विदर्भाच्या भूमीत 'शू'दानाबरोबरच 'शी'दानही केले. एका दयाळू प्याशिंजरने धुण्यासाठी आपली पिण्याच्या पाण्याची बाटली देऊ केली (सरप्रायाझिंगली ती बाटली बिसलेरीची नव्हती!). यथावकाश धुण्याचाही कार्यक्रम पार पडला. असा हा साघ्रसंगीत सोहळा एकदाचा आटोपला आणि प्याशिंजरांनी टाळ्या वाजवल्या. गडचिरोलीला पोचण्यासाठी दोनाचे अडीच तास होतील म्हणून कोणीच गोंधळ घातला नाही. ह्या प्याशिंजरांना घड्याळाचे काटे किंवा कोणतेही इन्सेंटिव्ह कंट्रोल करत नव्हते. म्हणूनच ते जीवनाचा प्रत्येक क्षण जगत होते, अनुभवत होते, त्याचा आनंद घेत होते. सहजपणे एक-दुसऱ्याच्या सुखदुःखात, अडीअडचणीत समरस होत होते.

गडचिरोलीस पोचल्यानंतर धानोऱ्याला जाणारी बस पकडली. गडचिरोलीच्या आसपास विरळ झालेले जंगल पुन्हा एकदा घनदाट झाले. जंगलाचा लांब निर्मनुष्य पट्टा आणि मध्येच नजर लागू नये म्हणून जंगलाच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावे. वाटेत एक पाटी वाचली. 'अभिनंदन! अमुक अमुक गावात २००९ साली एकही बालमृत्यू नाही.' सर्च जवळ आल्याची खात्री पटली. चातगावजवळ उतरून थोडेसे चालत गेल्यानंतर मी डॉ. अभय व राणी बंग यांच्या कार्यक्षेत्रात, शोधग्रामला दाखल झालो.

शोधग्रामच्या कमानीतून प्रवेश करतो तोच अतिशय मधुर असा किलबिलाट ऐकून माझी पावले थबकली. पाहिले तर दोन रॉबिन्स कोणत्या तरी विषयावर गंभीर चर्चा करत होते. नाही तर आमच्या डोक्यात दोनच आवाज फिट्ट! एक ऑफिसमधला ए.सी. आणि दुसरा कॉम्प्युटरचा पंखा. ट्राफिकचा गोंगाट तर आजकाल इतका रक्तात भिनलाय की हृदयाच्या ठोक्यांप्रमाणे तो ऐकू येणेही बंद झालंय. पक्ष्यांचा आवाज सोडाच, माणसेही एकमेकांशी बोलणे म्हणजे दसरा-दिवाळी. असो. त्या रॉबिन्सच्या चर्चेत अनेक पक्ष्यांनी सहभाग घेणं सुरू केलं. फुलपाखरे मध गोळा करता करता हळूच ही चर्चा ऐकू लागली. मन कसं प्रसन्न टवटवीत झालं.

शोधग्रामला पोहोचण्याआधीच मन मोहोरून गेलं होतं. आता शोधग्राममध्ये पुढचे दोन दिवस जे काही अनुभव मिळतील ते तर बोनस होते. तसं पाहिलं तर पक्षी, झाडे पाहून एवढं खूष होण्याची काय गरज होती? मला वाटतं निसर्गाकडे माणसाची एक नैसर्गिक ओढ असते. मात्र आपल्या मनात पैसा व इतर materialistic गोष्टी हेच माणसाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे असे घडत्या वयात बिंबवले जाते. मग आपण आपल्या सर्व नैसर्गिक कलांना बगल देउन निसर्गापासून दूर पैशाच्या खाणीत मोलमजुरी करत राहतो. एक वेगळे छोटेसे कृत्रिम विश्व आपल्या भोवती तयार करतो. याच मर्यादित जागेत आपला विस्तार करण्यासाठी धडपड करतो. या विस्ताराची किंमत मग मनाची शांती देउन चुकवावी लागते.

शोधग्रामचे हे प्रवेशद्वार मला कृत्रिम व मर्यादित विश्वाच्या भिंती ओलांडून अधिक नैसर्गिक आणि अधिक स्वाभाविक विश्वात प्रवेश करण्यासाठी खुणावत तर नव्हते?


    - निखिल अनिल जोशी
            हैदराबाद  
      मार्च, २०१०