Friday, July 22, 2011

मुक्त

आटपाट झाड होते, एक वडाचे म्हातारे
दाढी होती दाट त्याची, अन् डोक्यावर भारे

वाटसरूला सावली, मिळो पाखरा घरटे
उभे आशीर्वाद देत, उन्ह्सरींत एकटे

माया माऊलीची लावी, त्याची लेकरे पाखरं
पानाफांद्यांत घरटी, माती-मुळाशी भाकर

सायंकाळी पाखरांची, तेथे गाठभेट होई
कीलबीलाट करता, नभ निनादुन जाई

गुण्यागोविंदानं होतं सारं सुरळीत सुरू
कोणी लाविली नजर, वेडं जाहलं पाखरू

हाड तुटता जिभेचं, ताळतंत्र सोडूनिया
एकाएकी लागलं ते, वेडे त्वेषाने बोलाया

“वीट आला आहे मज, माझ्या विटाळ जिण्याचा
भोग भोगले कितीही, तरी ठाव न सुखाचा

दीसभर शोधूनिया, किडे-मकोडे मातित
जगू तरी कसे असे, घास घशात ओतीत

घाम गाळूनिया एक एक काटकी जोडणे
पण ओल पावसात, उन्हातान्हात भाजणे

पुरे झाली फरफट, आता घेईन भरारी
सोनियाच्या पिंजऱ्यात, कुण्या सधन महाली

पिंजऱ्यात सोनियाच्या, चैन चणे-फुटाण्याची
बंद खोलीत कसली, भिति ऊन-पावसाची

पारध्याच्या जाळ्यामध्ये, अडकवून घेईन
धनिकाच्या घरी मग, सून बनून जाईन"

क्षणभर कूजबूज, मग शांतता भयाण
पानांतूनी टपटप, आसू ढाळले वडानं

“दिल्या घरी रहा सुखी", वड बोलला क्लेशाने
जळे कापरे काळीज, खोलवरच्या खेदाने

*****************

मोठमोठ्या जखमांना, नामि औषध काळाचे
हळुहळू सावरले, नातलग पाखराचे

अचानक एके दिनी, थोडे चालत उडत
परतले पाखरू का, घरी रडत रडत

भाऊबंद जमा झाले, वड रोखुनी नजर
ऐकण्यास पाखराची, सारे कहाणी आतुर

“कसा पळ काढला मी, काय भोगल्या यातना
नका विचारू, काहीही बोलवेना साहवेना

चूक झाली मायबाप, जीवाभावाच्या सख्यांनो
मृगजळामागे आता, जाणे होणे न गड्यांनो

जिला माती म्हटले मी, माझ्यासाठी तेच मोती
गळणाऱ्या नभीच रे, फुले अभिमानी छाती

सोनपिंजरा नको तो, छाटे पंख जो मनाचे
प्रिय झोपडे वडाशी, देई स्वप्न गगनाचे

कशापायी भुललो मी, आज आरसा बघेन
ऋण फेडीन वडाचे, मग मातीत मिळेन"

वड पहाडाएवढा, गहीवरोनिया गेला
धीरगंभीर मार्दव, थोड्या प्रेमाने बोलला

“बाळा मिळते म्हणून, सदा मागत का जावे?
मातीमोल मोहापायी, कधी स्वतःला विकावे?

गगनाला गवसणी, घालण्याचा रे स्वभाव
तर हवी कशापायी, सोनपिंजऱ्याची हाव?

किडे-काटक्या वेचणे, तुझ्या जीवनाचे मर्म
हाच नाही का रे वेड्या, तुझ्या कूळाचा स्वधर्म?

जीवाच्याही खूप आधी त्याचा स्वधर्म जन्मतो
त्यागल्यासी कोरे गोटे, पाळल्यासी लेणी होतो

कधी होतो कोणी सुखी, सांग कर्तव्य टाकूनी?
मुक्तीपथ बहरतो, स्वधर्माचिये बंधनी ”

(प्रेरणा: मंगेश पाडगावकरांच्या पुढील ओळी-
'काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी
 भान राधिके नुरे ऐकताच बासरी
 बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा')


- निखिल अनिल जोशी
गडचिरोली
२२-७-२०११