Friday, April 6, 2012

अम्मांचिया गावी प्रेमाचा सुकाळ


     पेशंट डॉक्टरना अजूनही देव मानतात. शहरात नसले तरी खेड्यात मानतात. पण एक डॉक्टर पेशंटकडे कसा पाहत असावा? किंवा त्याने कसे पाहिले पाहिजे? आपल्या कमाईचा स्त्रोत का सेवा करण्याची संधी देणारा देवदूत? रोग बरा करून घेण्याकरता आलेली एक व्यक्ती का समाजातील दारिद्र्य, रोगराई, चांगल्या-वाईट चालीरीतींचे एक पुसट प्रतिबिंब? आपला उद्धटपणा हतबलपणे सहन करणारा एक याचक का ज्याच्यापुढे नम्र व्हावे असा पारंपारिक ज्ञानाचा चालताबोलता खजिना? माझ्या सुदैवाने मला डॉ. राणी बंग (अम्मा) यांच्यासोबत काही महिने काम करण्याची संधी मिळाली. त्या आपल्या रोग्यांकडे कशा बघतात हे जवळून बघता आले.

     खास अम्मांना दाखवण्यासाठी इथल्या दवाखान्यात दोन-दोनशे किलोमीटर अंतरावरून पेशंट येतात. त्यासाठी त्यांचे ज्ञान, आपल्या क्षेत्रातले कौशल्य ही कारणे आहेतच, पण त्याहीपेक्षा मला त्यांचे भावते ते पेशंटसोबत संवाद साधण्याची हातोटी. प्रेम व दरारा यांचे सुयोग्य मिश्रण असलेले ते एक अजब रसायन आहे. आपल्या आई-वडिलांसमोर अजिबात तोंड न उघडणाऱ्या मुलींना, नवऱ्यासमोर मान वर काढण्याची हिम्मत न करू शकणाऱ्या बायकांना बोलते कसे करायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. जास्त पुढे पुढे करणाऱ्या नवऱ्यांना त्या एका झटक्यात शांत करतात. बाईने एकटीनेच आत यावे, आपल्या तक्रारी स्वतःच सांगाव्यात असा त्यांचा कटाक्ष असतो. स्वतःला स्वतःबद्दल बोलण्याची कधीही संधी न मिळणाऱ्या बायका मग त्यांच्यासमोर भरभरून मन मोकळे करतात
  
     मात्र आयुष्यभर पदराआड राहण्याची सवय असणाऱ्या खेड्यातल्या स्त्रिया कधी कधी भिडेखातर स्त्रीरोगाच्या तपासण्या करून घ्यायला तयारच होत नाहीत. किंवा कधी कधी पेशंटना काहीच झालेले नसते. पण तसे सांगून त्यांचे समाधान होत नाही. 'औषधी द्या ना जी.' म्हणत ते गोळ्या/इंजेक्शनचा प्रचंड आग्रह धरतात. अशा वेळी गरज असते ती अधिकारवाणीने रागावण्याची. त्यात अम्मा अजिबातच कसर सोडत नाहीत. डोळे वटारले की अर्धे काम तिथेच होते. नर्सेसना न जुमानणारे पेशंट त्यांच्यापुढे लगेच शांत होतात. मात्र त्यांच्या रागावण्यात वैयक्तिक द्वेष कधीच नसतो. त्यांच्याकडून मी एक गोष्ट चांगलीच शिकलोय. प्रेम म्हणजे केवळ गोड गोड बोलणे नव्हे. पेशंटच्या भल्यासाठी प्रसंगी कठोर होणे हेच खऱ्या डोळस प्रेमाचे लक्षण आहे.

     अम्मांच्या केबिनबाहेर नेहमी एक नेल-कटर लटकत असतो. पेशंटची नखं वाढली असतील तर तिची काही धडगत नसते. "आधी नखं कापून ये, त्याशिवाय मी नाही तपासणार." असा आदेश घेऊन पेशंट बिचारी हात हलवत नेलकटरकडे जाते. मात्र पेशंटला एक न्याय व स्टाफला दुसरा असा इथे रिवाज नाही. नर्सेस, बरोबरीचे डॉक्टर्स, कोणाचीही नखे वाढली असतील तरी रवानगी नेलकटरकडे होते. नखं कापण्यासाठी रागावणं म्हणजे मला नम्रतेचं प्रतीक वाटतं. 'मी specialization केलंय. मी केवळ गोळ्या प्रिस्क्राईब करेन, इंजेक्शन देईन, सोनोग्राफी करेन, सर्जरी करेन.' असा इगो न ठेवता 'पेशंटची नखे वाढणे हेही अनारोग्याचेच लक्षण आहे आणि ते दूर करणं ही माझीच जबाबदारी आहे' असा holistic approach घेणे ही त्यांची विशेषता आहे.
 
    पेशंटची गैरसोय होऊ नये याबाबत त्यांचा कमालीचा कटाक्ष असतो. दररोज दोन-तीनदा त्या सगळे संडास बाथरूम्स स्वच्छ आहेत ना याची खात्री करून घेतात. तसेच दवाखान्याचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी त्या कमालीच्या आग्रही असतात. एकदा एका बाळाने दवाखान्याच्या आवारातच संडास केली होती. लगेचच ती स्वतः अम्मांना साफ करताना मी पाहिलंय. एखादे उद्दिष्ट सर्वोच्चपदी ठेवले तर 'मी'पणा दुय्यम होऊन जातो व कोणतेच काम हलके उरत नाही हे शिकतोय मी त्यांच्याकडून.

     एकदा एक आई आपल्या मुलीला दाखवायला घेऊन आली होती. मुलीचे नाव होते 'निराशा मोहुर्ले.' अम्मांनी तिला केबिनमध्ये बोलवले, तपासले, औषधे लिहून दिली. नंतर तिच्या आईला आत बोलावले. थोडी खोलात चौकशी केली असता कळले की खूप इच्छा असूनही मुलगा झाला नाही म्हणून वैतागून बाळाचे नाव निराशा ठेवले होते. अम्मांनी आईला झाप झाप झापले. एक स्त्री असूनही आईने याला विरोध केला नाही याची त्यांना मनस्वी चीड आली होती. 'पुढच्या वेळी यायच्या आधी हिचं नाव बदलून आशा ठेवलं नाही तर मी तपासणार नाही' अशी ताकीद दिली. इथेही 'केवळ आरोग्य' असा reductionist approach न ठेवता holistic approach ने त्यांनी त्या प्रसंगाकडे ज्या सहजतेने पाहिले त्यातून खूप काही घेण्यासारखं आहे.
 
    एकदा एक तेलगु बोलणारी बाई नवऱ्यासोबत दवाखान्यात आली. नवरा तर मराठीतूनच बोलायचा. चौकशी करता लक्षात आले की ते कुटुंब व्यवसायासाठी आंध्रमधून गडचिरोली जिल्ह्यात आलं होतं. गेली १६ वर्षे ते गडचिरोलीतच राहत होते. अम्मांनी 'हिला मराठी का येत नाही?' असं नवऱ्याला विचारलं. नवरा म्हणाला 'गरजच पडत नाही. घरात सगळे तेलगुच बोलतात.' ही बाई १६ वर्षे घराच्या बाहेर पडून कोणाशी बोललीच नाही याचा अम्मांना प्रचंड राग आला. अम्मांची स्वतःची मातृभाषा तेलगु आहे. स्वतःचे उदाहरण देऊन त्यांनी नवऱ्याला मराठीतून व बायकोला तेलागूतून झापले. केवळ चूल व मूल यांच्यात अडकून न राहता घराबाहेर पडण्याची व मराठी शिकण्याची ताकीद दिली व मगच त्यांना तपासले.
 
    जगातले सगळे ज्ञान आपल्याकडेच आहे, समोरचा याचक पेशंट मायबाप डॉक्टरांकडे आरोग्याची भीक मागण्यासाठी आला आहे व आपले frustration त्याच्यावर काढण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे अशी प्रामाणिक समजूत असलेल्या डॉक्टरांचा जिकडेतिकडे सुकाळ झालेला असताना अम्मांची नम्रता मला कमालीची भावते. पेशंट आपल्याला खूप काही शिकवू शकतो याची जाण असलेल्या अम्मा सदैव पेशंटकडून काय शिकता येईल या शोधात असतात. एखाद्या पेशंटची साडी आवडली तर तिला थांबवून त्यावरचे डिझाईन काढून घेतात. एखाद्या पेशंटने गावठी औषधीबद्दल सांगितले तर त्याला मूर्खात न काढता तो काय बोलतोय हे खरं आहे का याची खात्री करून घेतात. झाडे व बागकामात विशेष रस असल्यामुळे लोकल भागात आढळणाऱ्या झाडांबद्दल एखाद्या अडाणी पेशंटला विचारतानाही मुळीच कचरत नाहीत. लोकांच्या परंपरा व समजुती कशा जाणून घेता येतील या प्रयत्नात त्या सदैव असतात. त्यासाठी पेशंटसोबत, त्यांच्या नातेवाईकांसोबत एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाने बोलतात. पेशंट व नातेवाईकही उत्साहाच्या भरात खूप काही सांगून जातात. मग ओपीडी म्हणजे केवळ रंजल्या-गांजल्या खचल्या-पिचल्या पेशंटची तुडुंब गर्दी न उरता गडचिरोलीच्या संस्कृतीची एक प्रदर्शनीच होऊन जातो. दवाखाना तोच असतो, पण केवळ पहायची दृष्टी बदलते व रोजचं रहाट घाडगं सुखकर होऊन जाते. माझे दवाखान्यातले काम संपून आज बरेच महिने उलटले आहेत. पण कधी काही कारणाने मन उदास झाले की आयुष्याच्या क्षणाक्षणात व कणाकणात सौंदर्य शोधणाऱ्या अम्मा डोळ्यांसमोर येतात, एका क्षणात मरगळ गळून पडते व मन पुन्हा एकदा प्रफुल्लित होऊन जातं.

  • निखिल जोशी
    ६ एप्रिल, २०१२
    गडचिरोली