Sunday, March 24, 2019

वृक्षाकार !पॉंडिचेरी

फेब्रुवारी 2017

मासेमारी कलाकारीसावरगाव, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली

सप्टेंबर 2016

Camouflage
ओळखा पाहू...

शोधग्राम, गडचिरोली

मार्च 2016

Privilege


ही कुठली सहल नाही...

होळीच्या सणासाठी आश्रमशाळेतून 8-10 किमी पायपीट करत सर्व सामान बॅगांमध्ये भरून आपल्या गावाला जाणारी मुले (तालुका भामरागड, जिल्हा गडचिरोली).. माझी शाळा घरापासून 2 किमी लांब. मात्र आम्हाला या वयात स्पेशल रीक्शा शाळेत पोचवायला व शाळेतून आणायला असायची.

मार्च 2015

गरीबांचा फ्रीज


एकांबा (जिल्हा- यवतमाळ, तालुका-उमरखेड) गावात एका घरी पिण्याचे पाणी थंड करण्यासाठी माठाभोवती पोत्यावर माती लिंपून गहू पेरला होता...
#जुगाड

एप्रिल 2017

फ्री !!?या हॉस्पिटल मध्ये फुकटात वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजून देतात.

मात्र तपासून घ्यायला गेले की BMI काढण्याआधी डाएट क्लिनिकची माहिती ऐकून घ्यावी लागते.

Nutrition च्या या कैवाऱ्यांनी मागे बर्गर, सामोसे इ फास्ट फूडचीही जाहिरातही लावली आहे...

म्हणजे आमच्याकडे फास्ट फूड खा. वजन वाढले, BP-Sugar इ. रोग झाले की डाएट प्लॅनसाठी आमच्याकडेच या. तरीही आजार वाढलाच तर आमच्या ICU मध्ये अत्याधुनिक सोयी आहेत, आौषधे घ्यायला आमचीच फार्मसी आहे.

फुकटच्या BMI चे अमिष दाखवून मुंबईच्या बड्या हॉस्पिटलमधील डाएट क्लिनिकचे अजब मार्केटिंग... 

ऑक्टोबर 2014

रांग


ही एखाद्या देवळातली, दवाखान्यातली, तहसील ऑफिसमधली रांग नाही.

ही रांग आहे दारूच्या दुकानासमोरची!

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 500 मी अंतरावर दारूविक्रीवर नुकतीच बंदी आणली. या निकषांत न बसणाऱ्या पुण्यातल्या दारूच्या दुकानात ऐन संध्याकाळी गर्दी उसळली होती. अतिशय शिस्तीने 3 रांगांत गिर्हाईक आपल्या संधीची वाट पाहताना दिसत होते. अशी गर्दी गेले 3 आठवडे दर दुपारपासून सुरू होत असल्याचे जवळच्या दुकानदारांनी सांगितले.

एप्रिल 2017

Sunday, February 24, 2019

महानायिका


पुण्यातल्या 'हिरवळी'पासून दूर, हडपसरला, तेही दुर्लक्षित अशा हांडेवाडीला घर शिफ्ट करायचं म्हणून थोडा नाराजच होतो. पण अनपेक्षितपणे तिथे राहणे आवडू लागले. गॅलरीतून दिसणारी हिरवीगार टेकडी, टेकडीआड क्षणाक्षणाला रंग बदलणारा सुंदर सुर्यास्त, सूर्यास्ताच्या वेळी चमकून उठणारे ढगांचे चित्रविचित्र आकार, त्यांच्या रंगीत कडा व त्यातून डोकावणारे कवडसे, एखाद्या पौर्णिमेला रात्री टेकडीवर दिसणारे लालबुंद पूर्ण चंद्रबिंब, दक्षिणेला दूरवर कात्रज-सासवडच्या सह्याद्री रांगा, एवढ्या दूरूनही स्पष्ट दिसणारे या रांगांमधले बेसॉल्टचे आडवे थर, हांडेवाडीला लागूनच असणारा शांत व हिरवागार असा कॅंटॉनमेंट एरिया, या एरियातल्या रिकाम्या व चकाचक रस्त्यांवर गाडी चालवायचे सुख, मनात आले की गजबजाटापासून दूर दिवे घाटात जाण्याची मोकळीक हा जगण्याचा सुंदर भागच बनला.
मात्र एका वर्षाने हांडेवाडी सोडताना या सर्वांपेक्षाही एका गोष्टीची खूपच हुरहुर वाटली. या घरात तब्बल एक वर्ष आम्हाला एका महानायकाचा सहवास मिळाला होता. तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही, पण जगातल्या सर्वोत्कृष्ट अशा दोन कलाकृतीत काम केलेला हा महानायक न्यू यॉर्क, साउथ मुंबई, बांद्रा, कोथरूड किंवा सदाशिव पेठेत नव्हे, तर आमच्याजवळ चक्क हांडेवाडीला राहत होता. या महानायकाला आम्ही रोज भेटायचो, त्याचे निरीक्षण करायचो, त्याच्याकडून शिकायचो. काय? कुठल्या कलाकृती असे विचारताय? सांगतो. या कलाकृती होत्या जॉर्ज आॅरवेलचे अॅनिमल फार्म व नागराज मंजुळेची फॅंड्री. आणि हा महानायक म्हणजे डुक्कर! नोटाबंदीनंतर तिथला बांधकाम व्यवसाय मंदावल्याने आमच्या बिल्डिंगसमोर समोर चक्क दोन मोठे मोकळे प्लॉट उरले होते. या प्लॉट्सना चारही बाजूने पत्र्याचे कुंपण घातले होते. बाकी कुणालाच एंट्री नसणा-या या प्लॉट्समध्ये कसेबसे शिरून डुक्करांनी संसार थाटला होता. सर्व मित्रमैत्रिणींपासून दूर हांडेवाडीला असताना डुक्करांचे निरीक्षण करायचा मला छंद लागला. त्यांनी मानले नाही तरी मी त्यांना मनापासून मित्र मानले.
डुक्कर म्हणजे काळ्या रंगाचा, ढेरी सुटलेला, कुरूप, गटारीत पडून राहणारा, आळशी, मानवी विष्ठा व त्यासारखे घाणेरडे पदार्थ खाणारा, कुणाचेही त्याच्याकडे लक्ष जाणार नाही, गेलेच तर कुणीही नाक मुरडेल व नजर फिरवेल असा प्राणी; असा माझा प्रामाणिक समज होता. या समजाची आमच्या वराह मित्रांनी पार वाट लावून टाकली.
कुठलीही गटार नसताना या प्लॉट्समध्ये डुक्कर कुटुंबिय सुखाने राहत होते. काही काळे होते, काही पांढरे होते, काही काळे पांढरे होते. काही पिल्ले तर चक्क गुलाबी होती. ही डुक्करे मला कधी प्रयत्न करूनही कुरूप दिसली नाहीत. पिल्ले तर खूपच गोड होती. आईच्या मागे एका रांगेत पळत पळत जायची. एक छोटीशी काटकी ओलांडतानाही अडखळायची, पडायची. गवतात गेली की गवताआड लपून जायची. एकमेकांसोबत खेळायची, भांडायची. ठराविक वेळ झाला की त्यांची आई आडवी पडायची. सर्व पिल्ले एकाच वेळी दूध पिण्यासाठी तुटून पडत. दूध पिण्यासाठी मोक्याची जागा मिळावी म्हणून आईच्या अंगाखांद्यावर धडपडत उड्या मारत. पिल्लांमध्ये जिवंत चैतन्य जाणवायचे. स्थितप्रद्न्य आई मात्र त्यांच्या बाललीलांकडे दुर्लक्ष करत शांतपणे पडून राही.
डुक्कर गवतही खाते असे मला पहिल्यांदाच इथे समजले. पावसाळ्यातल्या हिरव्यागार गवतावर चरणारे पांढरे डुक्कर पाहून मला युरोपात असल्याचा भास होई. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हात, घड्याळाच्या लंबकाप्रमाणे संथपणे शेपटी हलवत तासन् तास हा मनस्वी प्राणी मनसोक्त गवत खाई व गवत खाताना मी त्याच्याकडे एकटक बघत राही.
पत्र्याच्या कुंपणामुळे हे दोन प्लॉट्स म्हणजे डुक्करांचे अभयारण्य झाले होते. तिथे त्यांचा संसार फुलत होता, फळत होता. या अभयारण्याच्या चारही बाजूंनी होमो सेपियन या प्राण्याचे वास्तव्य होते. त्यांच्यातले अनेक कर्तबगार सेपियन्स दुस-या तिस-या मजल्यावरून या प्लॉट्समध्ये प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून कचरा फेकायचे. नुकत्याच जन्मलेल्या डुक्कर बाळांसाठी तो जणू बॉंबच! बिचारी घाबरून पळून जायची. त्यांची अनुभवी आई मात्र शहाणी होती. तिला या सेपियन्सच्या स्वभावाचा अंदाज होता. कच-याचा गोळा दूरवरून आला की घाबरून पळून न जाता खात असलेले गवत सोडून ती त्या गोळ्याकडे धाडसाने जाई. त्या गोळ्यात काही खायला मिळते का याचा शोध घेई. या गोळ्यांनी बहुतेक वेळा तिला निराश केले नाही. हळूहळू डुक्करबाळेही गोळ्यात अन्न शोधायला शिकली. त्यांचे हे आॅन जॉब ट्रेनिंग बघण्याची मला संधी मिळाली.
On Job training

काळी डुक्करे वेगळीकडे व पांढरी वेगळीकडे राहतात असे मला कधी दिसले नाही. त्यांच्यात कधी वैरभाव जाणवला नाही. त्यांना एकमेकांसोबत आरामात चरताना मी किती तरी वेळा पाहिलं आहे. काळ्या व पांढ-या डुक्करांमध्ये मीलनाला मनाई नव्हती. काळ्यापांढ-या रंगांची पिल्ले ही या प्रेमाची साक्ष होती.
डुक्करांच्या जगातल्या मान्यता आपल्यापेक्षा खूप वेगळ्या होत्या. माणसांसमोर किंवा इतर डुक्करांसमोरही मीलन करताना डुक्करांना कोणतीही भीड किंवा लाज वाटत नसे. एकपती / पत्नी व्रताला डुक्कर जमात फार महत्त्व देत नसावी. ब्रेकअप झाले की वर्षभर दुःखात राहिलेलेही मी डुक्करांना पाहिले नाही. इन फॅक्ट एका सुंदर डुक्करीने हटकले तर उत्तेजित नर फारसे निराश न होता दुस-या सुंदरीच्या मागे लागे. या मीलनाला रंगाचे व वयाचे बंधन नव्हते. पत्रिका पाहणे, भटजी, घरवापसी, आॅनर किलिंग या मोहमायेच्या पलिकडे गेलेले हे एक आध्यात्मिक जनावर होते.
मला वाटायचे अभयारण्यात वाढत असल्यामुळे ही डुक्करे मनसोक्त जगतात. -याखु-या जगात यांचा निभाव लागणार नाही. कुत्री यांना सळो की पळो करून सोडतील. एकदा कधीही एकत्र न येणारी तीन कुत्री डुक्कराच्या पिल्लाला मारण्यासाठी एकत्र आली. फासे बरोबर पडले तर आठवड्याच्या मेजवानीची सोय झाली असा त्यांचा विचार असावा. एक पिल्लू, तीन बाजूंनी तीन आक्रमक कुत्री. पिल्लू गयावया करू लागले. सगळा खेळ संपला असे वाटले. तेवढ्यात रजनीकांतच्या सिनेमाप्रमाणे दुरून धुरळा उडताना दिसला व जणू शंख फुंकावा असा मोठा आवाज आला. काही कळायच्या आत एक जाडजूड डुक्करी वायुवेगाने पळत आली. तिनही कुत्र्यांना तिने एकटीने अंगावर घेतले. जीव मुठीत धरून कुत्री जोरदार पळाली. पुढची दहा मिनिटे दूरवरून त्यांची कुई-कुई एेकू ये होती. दहा मिनिटांनी विजयी डुक्करी एेटीत कॅट वॉक करत परत येताना दिसली. पिलांच्या संरक्षणासाठी या डुक्करांना मी कुत्र्यांवर धावून जाताना पाहिलंय, इतर डुक्करांवर धावून जाताना पाहिलंय, सर्वशक्तीमान मनुष्यप्राण्याला चावलेलं एेकलंय.
डुक्कराची आई व पिल्लांचे नाते कसे असते याबद्दल माझ्या मनावर खोल परिणाम करणारी गोष्ट घडली. एेन हिवाळ्यात एका डुक्करीची डिलिव्हरी झाली. एक नाही, दोन नाही, चक्क आठ गोंडस पिलांचा जन्म झाला. अशा पिल्लांच्या बॅचचा जन्म दर एक दोन महिन्यांनी आमच्या अभयारण्यात व्हायचा. मात्र ही बॅच स्पेशल होती. त्यांचा वावर आमच्या गॅलरीतून स्पष्ट दिसायचा. अगदी लाईन आॅफ साईट. त्या वेळी आमच्या सासूबाई आल्या होत्या. रोज सकाळी या नव्या फॅमिलीचे निरीक्षण करणे हा सासूबाई, सिंधू व माझा छंद झाला. एखाद्या दिवशी फॅमिली दिसली नाही तर हुरहुर वाटायची.
बाळ सांभाळणे हा काही चाईल्ड'स प्ले नाही. माणसाच्या बाळांना सांभाळण्यासाठी चांगलीच सपोर्ट सिस्टीम असते. काही नवरे हातभार लावतात. आई-बाबा, सासू-सासरे खुशीने ओनरशिप घेतात. जॉईंट फॅमिली असेल तर अगदी सीमलेस संगोपन होते. ग्रामीण भागात बाळाचे मोठे बहीण-भाऊ बाळाला सांभाळतात, जेणेकरून आई-बाबा मजुरी करून अन्न मिळवतील. इकडे 'वन वुमन शो' होता. आठ पिल्लांचे संरक्षण, त्यांना भरवणे, त्यांचे ट्रेनिंग ही सर्व जबाबदारी डुक्कर आईने घेतली होती. डुक्कर बाबांना पिल्लांच्या जवळपास मी कधीच पाहिले नाही. आईने प्लॉटच्या मधोमध असणा-या बाभळीच्या झाडापर्यंत आपला एरिया ठरवून घेतला होता. ही लक्ष्मणरेषा कुठल्या इतर डुक्कराने ओलांडली तर ती त्वेषाने धावून जाऊन आक्रमकाला लांबवर पळवून लावायची. त्यामुळे संगोपनाची जबाबदारी दुस-या डुक्कराने शेअर करण्याचा प्रश्नच नव्हता. आठ पिलांना पाजून पाजून डोळ्यांसमोर रोज तिचे वजन उतरताना दिसत होते. दूध पिऊन पिल्ले उड्या मारू लागली तरी बराच वेळ ती झोपून रहायची. थंडी वाढत होती. पिल्लांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून एकदा कुठून तरी शोधून चटई आणताना तिला पाहिलं. चटई त्रिकोणी उभी करून चक्क घर बनवताना तिला पाहिलं. डुक्कर घरासारखं स्ट्रक्चर बांधतं हा मला धक्काच होता. सर्व पिल्लांना आत ढकलून स्वतः घराच्या उघड्या बाजूला झोपी गेली. या सगळ्याची तिला दगदग, थकवा वाटायचा का हे माहित नाही, पण तिचे श्रम पाहून मला टेन्शन यायचं.
चटईतले घरटे

एव्हाना माझ्या सासूबाईंना डुक्कर फॅमिलीबद्दल जिव्हाळा वाटू लागला होता. पहाटे पिल्ले उठली की त्या आम्हाला उठवायच्या. एके दिवशी त्यांनी असेच उठवले. त्यांच्या चेह-यावर काळजीचा भाव होता. गॅलरीत जाऊन पाहिले. पिल्ले तर होती. पण मोजली तर सातच भरली. आठवे पांढरे पिल्लू दिसेचना. हरवले असेल का? त्याला कुणी खाल्ले असेल का? त्याच्या आईला मोजता येत असेल का? ते गायब झालेले तिला माहित असेल का? खूप प्रश्न पडू लागले. त्याला शोधण्यासाठी डोळ्यांनी पूर्ण माळ स्कॅन केला. शेवटी एका कोप-यात पिल्लू दिसले. ते जिवंतही होते. त्याची हालचाल दिसत होती. मात्र काही मीटर चालून आई व भावंडांजवळ जाण्याएेवजी ते तिथल्या तिथे पुढे मागे करत होते. मग लक्षात आले की त्याचा एक पाय तारेच्या कुंपणात अडकून बसला आहे. ते पॅनिक होऊन पुढे पळण्याचा प्रयत्न करत होते. पाय अधिकच रूतत होता. त्याच्या आईने तिकडे अजून पर्यंत पाहिले नव्हते.
अडकलेले पिल्लू

चांगलीच थंडी पडली होती. या थंडीत आईच्या उबेशिवाय, दुधाशिवाय अडकलेले पिल्लू कसे जिवंत राहिल याची काळजी वाटू लागली होती. मी आणि सिंधूने जवळ जाऊन त्याला सोडवावे असा विचार केला, पण धाडस झाले नाही. आईने सावकाश इतर पिल्लांना दूध पाजले. नंतर हळुहळू चालत चालत अडकलेल्या पिल्लाजवळ गेली. म्हणजे तिला माहित होते तर! ती काही तरी करेल अशी आशा वाटू लागली. ती पिल्लाजवळ 5-7 मिनिटे उभी होती. काही बोलणे झाले का त्यांचे? माहित नाही. 5-7 मिनीटांनी पुन्हा ती पिल्लापासून दूर जाऊन चरू लागली. उरलेल्या सात पिल्लांना जगवण्यासाठी तिने हा कठीण प्रॅक्टिकल निर्णय घेतला होता.
हिवाळ्यातही गरम वाटेल इतकं दुपारी ऊन्ह पडलं होतं. आख्ख्या प्लॉटमध्ये फक्त तारेच्या कुंपणाजवळ थोडीशी सावली होती. मात्र सावलीत जावे तर दुसरे एख़ादे पिल्लू तारेत अडकून बसण्याचा धोका होता. आईनं शक्कल लढवली. त्या भागातलं गवत ती तोंडाने उपटून काढू लागली आणि तारेजवळ आणून टाकू लागली. हे करताना मध्येच अडकलेल्या पिल्लाजवळ जायची. थोडा वेळ तिथे उभी रहायची. पुन्हा जोमाने श्रमदान सुरू. एक-दीड तास तिची धडपड चालू होती. बघता बघता संध्याकाळपर्यंत तारेजवळ जणू गवताची गादीच तयार झाली. गादीवर आरामात झोपली आणि सात पिल्लांना पाजू लागली. हा प्रकारही माझ्यासाठी नवीन व धक्कादायक होता. विकीपेडिया उघडलं तर त्यात लिहिलं होतं की डुक्कर हा एक हुषार प्राणी आहे. आपल्या भोवतीच्या परिसरात बदल घडवून आणणा-या टॉप 100 प्राण्यात डुक्कराचा समावेश होतो


गवताची गादी
गवताच्या गादीवर पाजताना डुक्कर आई

सासूबाई रोज संध्याकाळी देवाची प्रार्थना करतात. आपली मुलं सुखी राहोत असे काहीसे देवाला मागतात. त्या दिवशी मात्र प्रार्थना करताना 'अडकलेलं पिल्लू वाचू दे' अशी मागणी सासूबाईंनी देवाला केली.
सकाळी कुणी तरी पिल्लाला सोडवले असेल या आशेने पाहिलं. पिल्लू अजून अडकलेलंच होतं. जिवंतही होतं. मात्र त्याची हालचाल क्षीण झाली होती.
दुपारी पाहिलं. आई पिल्लाजवळच होती, मात्र पिल्लाची कुठलीही हालचाल दिसत नव्हती. त्या नाजूक जिवाची जगण्याची चिकाटी संपली आहे हे कळून चुकले. त्याचा मृत्यू झाला होता. आम्हाला खूपच वाईट वाटले. डुक्करांना पिल्लू गेल्यावर वाईट वाटत असेल का? हे दुःख त्याची आई कसं व्यक्त करेल? पुढे त्या मेलेल्या पिल्लाचं काय होईल? कावळे येऊन लचके तोडून खातील का? असे प्रश्न पडू लागले. विचार करतच होतो, एवढ्यात अतिशय अनपेक्षित घटना घडली. आईने तोंडाने त्या मेलेल्या पिल्लाला तारेतून बाहेर काढले. तोंडानेच गवताच्या गादीवर नेले आणि काही मिनिटात लचके तोडून खाऊन टाकले. आम्ही स्तब्ध होऊन बघत राहिलो. एक आई आपल्या पिल्लाला खाऊ शकेल एवढे इतर पिल्लांना जगवण्याचे प्रेशर होते का? तिला जर पिल्लाला तारेच्या कुंपणातून कसे सोडवायचे हे माहित होते तर मग आधीच का वाचवले नाही? आणि जर पिल्लाला खायचेच होते तर आधीच का खाल्ले नाही?
ही घटना सासूबाईंना बिलकुल रूचली नाही. त्यांना डुक्कर आईचा प्रचंड राग आला. डुक्कर फॅमिलीला फॉलो करणे त्यांनी सोडून दिले. पिल्ले हळुहळू मोठी झाली, तसे त्यांचा एरियाही वाढला. आता क्वचितच ती घराजवळ यायची. हळुहळू सिंधू आणि मीही कामात बुडून गेलो. पुढचे काही महिने कसे निघून गेले कळलेच नाही. हांडेवाडीत एक वर्ष पूर्ण झालं. घरमालकासोबत केलेला करार संपला. नवीन घरी शिफ्ट होण्यासाठी सामान बांधून टेंपो तयार होता. टेंपोने बिल्डिंगबाहेर जात असताना अचानक कडेला बसलेली डुक्कराची पिल्ले दिसली. माझ्यासमोर सर्व प्रसंग जसेच्या तसे उभे राहिले. डोळ्यांत नकळत पाणी आले. अगदी दिसेनाशी होईपर्यंत मी पिल्लांकडे एकटक बघत होतो. पिल्लांनी मात्र माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.


निखिल जोशी
पुणे
24-02-2019