Wednesday, March 8, 2017

सामाजिक काम म्हणजे पायरी चढण्यास केलेली मदत



पूर्वप्रसिद्धी- लोकमत ऑक्सिजन, २ मार्च, २०१७

तुमच्या मते सामाजिक काम म्हणजे काय? त्याची गरज व व्याप्ती काय? या प्रश्नाला दिलेले उत्तर...
माणूस हा एकटा राहणारा प्राणी नसून तो समूहात राहतो. माणसे परस्परावलंबी असतात, एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात. स्वतःची उपजिविका करताना समाजातल्या कोणाला तरी उपयोगी पडण्याखेरीज माणसाला गत्यंतर नाही.त्याअर्थाने सामाजिक कामच करतात.
राजकीय पक्ष, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, CSR संस्था इथपासून गरजूंना वैयक्तिक मदत करणारे लोक हे सर्व सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने काम करतात (किमान असे बोलतात.). शेतकरी, कुंभार, लोहार, बॅंक कर्मचारी,शिक्षक इ. लोक आपल्या कामाला सामाजिक म्हणत नसले तरी समाजाच्या कुठल्या न कुठल्या घटकांच्या गरजा पूर्ण करण्याचेच काम करतात.
थोडक्यात सामाजिक काम म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या गरजा पूर्ण करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे.मनुष्याच्या गरजा काय असतात याविषयी अब्राहम मास्लो या मानसशास्त्रज्ञाने एक उतरंड मांडली आहे, तिच्या पाय-या पुढीलप्रमाणे-
Image result for maslow pyramid in marathi
) शरीर चालण्याची गरज - श्वसन, अन्न, पाणी, झोप, उत्सर्जन, समागम
) सुरक्षित वाटण्याची गरज - शरीराची, नोकरीची, आरोग्याची, संपत्तीची, कुटुंबाची सुरक्षितता
) प्रेम व आपुलकीची गरज – मैत्री, कुटुंब, आत्मीयता
) आदराची गरज – आत्मसन्मान, आत्मविश्वास, यश, इतरांकडून आदर, इतरांचा आदर
) स्वतःच्या पूर्ण क्षमतेने जगण्याची गरज – नैतिकता, सर्जनशीलता, ऊत्स्फूर्तता, समस्या सोडवण्याची क्षमता,पूर्वग्रहांचा अभाव, सत्याचा स्वीकार
मास्लोच्या म्हणण्यानुसार प्रत्येक माणसाला पूर्ण क्षमतेने जगण्याची (पायरी क्र. ) प्रेरणा असते. मात्र बहुतेक वेळा माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर पुढच्या पायरीच्या गरजा निर्माण होतात. समाजातील निरनिराळे घटक गरजांच्या निरनिराळ्या टप्प्यावर असतात. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावे पाण्याच्या अभावी पहिल्या पायरीवर असेल. शेतक-यांना शेतमालाच्या हमीभावाची (सुरक्षितता) गरज असेल. हजारो वर्षे ज्यांना अस्पृश्य म्हणून हिणवले गेले त्यांना प्रेम, आपुलकीची व आदराची गरज असेल. IIT मधून पास होणा-या इंजिनिअर्सना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणा-या आव्हानांची गरज असेल.
याचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार कोणत्या घटकाच्या गरजा पूर्ण करायच्या याची निवड करू शकतो. किती empowering गोष्ट आहे ही! प्रत्येकजणच सामाजिक कार्यकर्ता होऊ शकतो. सामाजिक काम करणारे नैतिकदृष्ट्या इतरांपेक्षा उच्च हाच मुळी गैरसमज ठरतो. सामाजिक काम करणारे आणि सर्वसामान्य हा भेदच संपून जातो.
पण... भारताबाबत बोलायचे झाले तर आज मास्लोच्या पहिल्या व दुस-या पायरीच्या गरजा पूर्ण करतानाच बहुसंख्य लोक झगडत आहेत. गरीबी, व्यसने, बेरोजगारी, बालमृत्यू, कुपोषण, दुष्काळ इ. समस्यांनी हे लोक त्रस्त आहेत. माणसापलीकडे विचार केल्यास जंगले, जैवविविधता, नद्या हेही अस्तित्वासाठी झगडत आहेत. मात्र त्याचसोबत बुद्धीजिवी मध्यमवर्ग मास्लोच्या पाय-या पटापट चढत चौथ्या-पाचव्या पायरीवर पोचला आहे.आपल्याला समाज म्हणून एकत्र पूर्ण क्षमतेने काम करायचे असेल, तर पुढच्या पायरीवरील लोकांनी मागच्या पायरीवरच्या लोकांना पाय-या चढण्यासाठी सक्षम होण्यास मदत केली पाहिजे.


निखिल जोशी

No comments:

Post a Comment