Wednesday, January 21, 2009

माझे गाणे

वर्षं सरली एक वीस
अजुनही नकळतच जातो दीस


बोललंच नाही कधी कोणी
तर बोलतात पक्षी, फुले, पाने
आणि स्वतःशीच बोललो कधी
तर आपोआप तयार होते गाणे
ओठांवरचे गाणे
भावुकपणे गात जातो
अन प्रारब्धाचा घास
आपसूकच खात जातो

प्रत्येकाचा घास ठरलेला
प्रत्येकाची ओंजळही ठरलेली
दाणे किती आणि खडे किती
यांची गणितेही ठरलेली
किती घ्यायचं आणि किती सांडायचं
याची वजाबाकी प्रत्येकाने ठरवायची असते
आणि सुरुवातीला काठोकाठ भरलेली ओंजळ
आयुष्यभर पुरवायची असते


वर्षं सरली एक वीस
अजुनही नकळतच जातो दीस

उमलणारी फुले आणि बागडणारी मुले
डुलणारी कणसे आणि गुंजणारा वारा
उडणारे पाखरू अन ढगांचा पिसारा
स्फुरणारी गीते अन फुलणारी स्मिते
हेच माझे धन मग हात जरी रिते


-निखिल अनिल जोशी
२१-०१-२००९

काळ आला होता पण...

प्रसंग तसा बाका होता, वातावरण तप्त होते
शांततेची चिन्हे दिसेनात, एकसतत आक्रमण सुरू होते
घड्याळाचे का काटे रुतले होते? वेळच पुढे सरकेना
आम्हा दीनांचा तो कैवारी, धावा करुनही येईना

आदल्या जन्मीचा सूड की या जन्मीची परीक्षा होती?
प्रसंगाची काठिण्यपातळी exponentially वाढतच होती
अखेर आमचा धावा ऐकून तो शांतिदूत ठणाणा करित आला
पाचची बेल झाली न आक्रमक "काही झालेच नाही" या अविर्भावात वर्गातून निघुन गेला

-निखिल अनिल जोशी

Thursday, January 1, 2009

भिंगरीचं आत्मवृत्त

घरघर भिरभिर अनंत वळणे
स्वतःभोवती घेऊन पडणे
घेता फिरकी हर्ष फुलावा
निश्चित जरी मग अडखळणे

फिरण्याचा मज गर्व नसावा
पडण्याचा अन खेद नसावा
सुंदर इतुके जीवन माझे
मरण्यालाही अर्थ नसावा

देवाघरल्या फुलांस रंजन
वाऱ्याचे ते अवीट गुंजन
आणिक नाही आकांक्षा मज
माझी मजला फुले निरंजन

धनिक निर्धन मज ना ठावे
कुणी न उजवे कुणी न डावे
निर्भय भरभर गिरगिर फिरुनी
प्रेम तयांचे परत करावे

मातीशी हे अतूट नाते
स्वार हवेवर होऊन वाटे
पर्वत मजला खुजा दिसावा
अवघे नभ अन मुठीत दाटे

काळ उलटला तपेन सरली
पुलाखालुनी बरेच पाणी
वाहूनि गेले; आता अडगळ
धुलिकण माझे सखे सोबती

अधूरी धूसरशी स्मृतिचित्रे
मनी दीवण्या जुळून येती
इच्छांचे या चिंतन करता
अश्रूंचे बंधारे फुटती

हाती कुणी मज अलगद उचलूनि
श्वास मोकळे परत करावे
झटकुनी विश्वाचि ही मरगळ
स्वच्छंदी अन मुक्त फिरावे


-निखिल अनिल जोशी