Sunday, November 15, 2009

या शब्दांनो, परत फिरा रे

कधी द्यायचे शब्द साथ मज, ऊन्ह-पावसा दरिशिखरातून
आज गिळाया उठले आहे एकाकीपण क्षणाक्षणातून

खिन्न होतसे तेव्हाही मी, अडकत धडकत जगत असे
कधी झुल्यातुन उंच ढगांवर, खोल कधी मी पडत असे
नसे शाश्वती जरी यशाची, पराजयाने मी न खचे
नसे निश्चिती मज मार्गाची, वहीवाटेहुन वळण रुचे

प्रवास माझा ऐसा होता, हर्षामधुनी गाणी झरली
डोळ्यांमध्ये दाटे पाणी, कविता तेव्हा खरी बहरली
पाहुन डोळे ओले धावे, सरस्वती अश्रूंस पुसाया
उदार होउन उधार देई, शब्द कवीतेतुन गुंफाया
क्षणात गाणे स्फुरे व्यथांचे, षड्ज नवेल्या चैतन्यातून
निर्माल्यातून कळी फुले मग, पर्ण पल्लवित पाचोळ्यातून

तिमीर दाटता दाहि दिशांनी, जिथे साथ सावली सोडते
तिथे माउलीपरी जिव्हाळा, सखे शब्द मज लावत होते
आनंदाच्या समयी क्षणभर मी न विसरलो त्यांना तेव्हा
दुःखी अन् एकाकी मज नच कधी सोडले त्यांनी तेव्हा


आज 'यशस्वी' होण्यासाठी शब्द सोडले, विचार धरला
कल्पनेतला विहार सोडून, बुद्धीवादी प्रवाह धरला
सळसळणारे भाव टाकुनी पोसत आहे हिशोब सारे
कसे जगावे स्वच्छंदी, जर भावबुद्धी हे विजोड वारे

गार्दीमध्ये मित्र हरवले, डाव खेळले फसले आहेत
आज भूताचा मार्ग काढता, शब्द मजवरी रूसले आहेत
यशस्वीता घ्या शब्दांनो, पण मनस्वीता मज परत करा रे
क्षयअक्षय्यामधली सीमा, पुन्हा एकदा ठळक करा रे


- निखिल अनिल जोशी
२८-१०-२००९
हैदराबाद

8 comments:

 1. बारक्या... महान रे... धन्य आहेस बाबा...

  शेवटच्या ओळीचा अर्थ जरा समजावून सांग...

  ReplyDelete
 2. शेवटी हैदराबाद मध्ये थोडा वेळ मिळालेला दिसतोय...भारी जमलंय

  ReplyDelete
 3. ....ata khabardar majhya kavitanna udas mhanalas tar...kavitetun dhasa dhasa radto aahes nusta...
  btw...Very good Poetry...Keep it up....khup chaan vatla :)

  ReplyDelete
 4. निखिल, हल्ली इकडे-तिकडे प्रेमावरच्या अत्यंत थर्डक्लास कविंतांचा सडा पडलेला दिसतो. त्या कवितांना ना यमक असतं ना अर्थ. असते फक्त बावळट रडारड. [माफ कर, छोट्या तोंडी मोठा घास घेतोय, पण जे वाटतं ते लिहीलं]
  अश्यात तुझी अत्यंत साचेबद्ध आणि समर्पक शब्द निवडून बांधलेली कविता एकदम भावून गेली.
  "पर्ण पल्लवित पाचोळ्यातून" मधला अनुप्रास सुरेख जमलाय.
  "यशस्विता घ्या शब्दांनो, पण मनस्विता मज परत करा रे" क्या बात है!
  खूप सुरेख जमली आहे रे... कवितेत तू व्यक्त केलेल्या सगळ्याच भावनांशी मी सहमत आहे.

  ReplyDelete
 5. u really need to get this stuff published... not for money but to reach a larger audience.. really good stuff

  ReplyDelete
 6. सर्वांना खूप खूप धन्यवाद

  @पश्या: काही नाही रे... खरा आनंद देणार्‍या गोष्टी आणि materialistic गोष्टी यांच्यातला फरक परत मनात बिंबवायला सांगितला आहे.

  @पिट्टू: ही पहिली रडकी कविता आहे. तुझ्यासारखं नेहमीच रडगाणं लावून बसत नाही.

  @शंक्या: प्रेमाच्या कवितांबाबत मी तुझ्याशी २००% सहमत आहे. पण मला खरच हल्ली सारखे प्रश्न पडतात. आपण कशाच्या मागे धावतोय, सुखी राहण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे का? हल्ली मला काही सुचतही नाही. असो. एवढ्या बारकाईने कविता वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद :)

  @कुशल: मी नक्की पाठवेन. शेवटी एक पूर्ण office working day घालवून कविता झाली आहे :)

  ReplyDelete
 7. काही कविता नुसत्या परत परत वाचाव्याशा वाटतात. प्रतिक्रिया एकच असते...साली अशी एखादी कविता मला कधी करता येइल का....??

  ReplyDelete
 8. Nikhil khup ch sundar kavita..me far ushira wachtey tuza blog, pan mast ch lihitoyas tu ekun..chaan watlya saglya ch post!
  Esp. hee kavita khup ch ArthaGarbha zali ahe..apratim!!

  ReplyDelete