Sunday, July 11, 2010

सायकल

माझ्या सायकलबद्दल एवढ्या लोकांची एवढी मतं असतील असं मला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. माझ्या आजुबाजूच्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा पार दृष्टीकोनच एवढ्या एका खरेदीमुळे बदलून गेला. काही तुरळक अपवाद वगळता बहुतेकांच्या नजरेतून माझी 'इज्जत' पार 'डाउन' झाली. सुरुवात झाली ती रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडून. रोज मला बघून अपंग असल्याचा आव आणणाऱ्या आणि गयावया करणाऱ्या भिकाऱ्याने त्या दिवशी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. सुरुवातीला बरं वाटलं. म्हटलं चला, सुंठेवाचून खोकला गेला. पण थोडा 'लॉंगटर्म' विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्याला भाव देणारा एकमेव घटकही आपल्याला 'इग्नोर' करू लागलाय. माणसाचं मन फार विचित्र असतं. एखादी गोष्ट त्याच्याजवळ असते तोपर्यंत त्याला तिचं महत्व त्याच्या लक्षात येत नाही. माझंही काहीसं असंच झालं होतं. ऑफिसला पोहोचल्यावर तर कहरच झाला. एकाच हापिसात असून जे मला ८--१० महिने कधीच भेटले नाहीत, ते सगळे आवर्जून भेटायला आले. बहुतेकांनी सहानुभूती व्यक्त केली. काहींनी उगीचच आजकालच्या आयुष्यात केवढा ताणतणाव आहे आणि सायकॅट्रीस्टकडे जाण्याची कशी गरज निर्माण झाली आहे हे पटवून दिलं. काहींनी 'बघू हे वेड किती दिवस टिकतय' असं उघडउघड चॅलेंज दिलं. आमच्या हापिसातली एकमेव मुलगी, आतातरी ती माझ्याशी बोलेल असं वाटलं होतं. पण तिनं नुसताच माझ्या वाढलेल्या पोटाकडे 'तिरपा कटाक्ष' टाकला आणि कुत्सितपणे हसत निघून गेली. सगळ्यांसमोर घोर अपमान झाला. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. माझा नेहमी हसतखेळत असणारा मित्र भलताच गंभीर झाला. त्याने मला माझ्या 'अविचारी' कृतीचं कारण विचारलं. मी खुष झालो. पहिल्यांदा माझी बाजू मांडण्याचा चान्स मिळाला होता. मी पाठ करून आणलेली बडबड सुरू केली. "आज ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न बिकट ...". क्षणार्धात त्याचा गंभीर भाव दूर होऊन आपण हापिसात असल्याची काहीही तमा न बाळगता तो जोरजोरात हसू लागला. मला गर्लफ्रेंड मिळण्याचे उरलेसुरले 'चान्सेसही' संपल्याचे त्याने 'डिक्लेअर' करून टाकले.

मी हापिसात कसाबसा दिवस काढला. परत निघताना सायकल काढायला गेलो तर टायर पंक्चर! हापिसाताल्याच कार्ट्याचं हे काम असणार यात मला काहीच शंका नव्हती. मी शाळेत केलेली पापं मला अशी ८ वर्षांनंतर फेडावी लागतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. चेहऱ्यावर उसने 'स्माईल' आणून काही झालंच नाही असं दाखवत, इकडेतिकडे बघत गुणगुणत ढकलगाडी सुरू केली. मागून काही जणांचा हसण्याचा आवाज आला, पण मी तिकडे लक्ष दिलं नाही. बरीचशी पायपीट केल्यानंतर कोपऱ्यात एकावर एक 'टायरी' रचून ठेवलेल्या दिसल्या. खाली बुट्टीत पाणी होतं. संजीवनी सापडल्याच्या आनंदाने मी तिकडे गेलो तर पंक्चरवालाच कुठं दिसेना. बरीच शोधाशोध केल्यानंतर तो टायरींमागे झोपल्याचे लक्षात आले. त्या कुंभकर्णाला उठवेपर्यंत मला झोप यायला लागली. एक डोळा उघडूनच त्याने 'सिर्फ बाईकका होता, सायकल का पंक्चर नही होता' एवढे बोलण्याचे कष्ट घेतले आणि उघडलेला डोळा परत मिटला. शेवटी खूप गयावया केल्यानंतर त्याला माझी दया आली. उठून त्या बुट्टीतलेच पाणी त्याने तोंडावर मारले. 'पांच मिनिट ठेहरो' असे बोलून तो जो तिथून गेला तो वीसेक मिनिटांनी इराणी चाय पिऊन एका हातात बीडी आणि दुसऱ्या हातात चैनी-खैनी घेऊन आला. शेवटी कसाबसा मुहूर्त लागला. पंक्चर निघालं. 'कितना हुआ?' असं विचारल्यावर 'तीस रुपया' म्हणाला. 'बेगमपेट में तो दस रूपायो में होता है"... मी आपला उगीचच अंधारात खडा मारला. 'नाईट को एक्स्ट्रा चार्ज लागता', त्याचं सणसणीत उत्तर. 'लेकिन मै तो श्याम को आया था, आपका चाय खतम होने तक रात हो गयी ये क्या मेरी गलती है?', माझा शेवटचा केविलवाणा प्रयत्न. 'देखो भैया, यहा पे ऐसा ही होता. हम लोग आप को थोडी बुलाते? पैसा बचाना तो बेगमपेट में क्यू नही जाते'? माझी प्रतिकारशक्ती संपली. तीस रुपये देऊन मी खाली मान घालून निघालो. मागून कोणाचा तरी आवाज आला. 'कैसे कैसे लोगा आते. खालीपिली नींद खराब करते और पैसा भी नही देते'. अर्थात मी तिकडे लक्ष दिले नाही हे सांगायची गरज नसावीच. पुढे एका हार्डवेअर शॉपमध्ये गेलो. सायकलला मजबूत लॉक घ्यावं म्हणून दुकानदाराकडे साखळी मागितली तर 'किस चोर को आपकी सायकल चुराने के लिये टाईम होता' असा कुजकट शेरा मारून त्याने साखळी तोंडावर मारली. पण माझा हैदराबादचे प्रदुषण कमी करण्याचा निर्धार पक्का असल्यामुळे असल्या शेऱ्यांना मी भीक घालणार नव्हतो.

मी घरी पोहोचेपर्यंत आमच्या मातोश्रींनी ही बातमी ब्रॉडकास्ट करून टाकली होती. एक एक करून समस्त मावशीवृन्दांचे फोन सुरू झाले. सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसला होता. बाईक घेण्यासाठी पैसे पाहिजेत का अशी विचारणा होऊ लागली. बाळ पैसे कमावू लागलंय, तुम्ही काळजी करू नका हे समजावून सांगता सांगता माझ्या नाकी नऊ आले. बाबांना पटवून देताना तर तारांबळ उडाली. सायाकालामुळे वाईट इम्प्रेशन पडून प्रमोशन मिळताना अडचण येईल असं त्यांचं म्हणणं होतं. मोठमोठ्या कंपन्यांचे म्यानेजर हल्ली सायकल घेऊन येतात असे सांगितल्यावर म्हणाले 'आधी आपली कार सगळ्यांना दिसली पाहिजे आणि मग नंतर सायकल घेऊन गेलं की कसा स्टेटस वाढतो... तुझं आपलं कशात काही नाही आणि मोठा आलाय मॅनेजर'. शेवटी मी पांढरं निशाण दाखवलं आणि वैतागून मोबाईल स्विच्ड ऑफ करून टाकला.

त्या दिवसापासून माझी सायकल आमच्या अपार्टमेंटच्या पार्किंगची शोभा वाढवत आहे. पण आजही तिचं वजन वाढलं नाही हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. (धूळ बसल्यामुळे वाढणारे वजन चाकातून कमी होणाऱ्या हवेमुळे मेन्टेन्ड आहे :) ). समस्त पर्यावरणवादी होतकरू तरूणांना माझा असा सल्ला आहे की त्यांनी सायकलच्या नादी न लागता पायी चालूनच प्रदूषणावर नियंत्रण मिळवावे. सायकलच्या मार्गावर टायर पंक्चर होणे हे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यांतून जाण्याएवढे स्वच्छ आणि स्पष्ट आहे.

प्रेरणा: उपास, बटाट्याची चाळ - पु. ल. देशपांडे

-----------------------------------------------------------------------------------

मी सायकलवरून मारलेली हुसैनसागरला मारलेली चक्कर:

(माझी डार्लिंग, सायकल)


(राजभवन मार्ग, हैदराबाद, भल्या पहाटे)


(एक सुंदर मंदिर)


(शेवटी बुद्ध हसला)


(टँकबंड)- निखिल अनिल जोशी
१२-०७-२०१०
हैदराबाद

10 comments:

 1. its really nice that you think about controling polution ... congrats

  ReplyDelete
 2. Abhinandan ....

  I too use and using cycle from so many years.... I like it most than car :)

  ReplyDelete
 3. sayakal ekadam zakas aahe ... kalaji ghyaa :)

  ReplyDelete
 4. Congrats n all the best.
  Karan Hyderabad madhe cycle chalavana he ek avhan ch ahe (Hatyar chalavana, chalval chalavana etc).

  ReplyDelete
 5. Lekh khup avadla...vachtana asa watla ki PuLancha "hasavnook fasavnook" vachtoy...zakkas...

  ReplyDelete
 6. :)
  बाय द वे, पंचर काढायला तीस रुपये?
  पच्चीस साल से सायकल पे बैठा हूँ, कभी आजतक पंचर का ५ रूपया भी नही दिया यारों!

  लेख आणि फोटोज दोन्ही आवडले यारों!

  ReplyDelete
 7. जमलयं... सायकल चालवत रहा आणि लिहित रहा...

  ReplyDelete
 8. bhariiii.... ek number....!!! ya warana ek athavala.... mazya pahilya antarshaley usphurt vaktrutva spardhet mala "cycle - mazi sakhi" asa vishay milala hota... 4 minitancha wel hota... mi 2 min madhech band padlo hoto... :D

  ReplyDelete
 9. उत्तम आहे लेख! वाचल्यावर पु लं चा प्रभाव आणि इन्स्पिरेशन झळकतय! इन पर्टिक्युलर "म्हैस" ची आठवण झली ...
  जमलाय बरक्या !

  ReplyDelete
 10. विजय आणि चैतू: आपण खरच सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. सायकल चालवणं हा खरच खूप चांगला अनुभव आहे...

  हर्षद: :):) आमचा घरापासून हापिसाचा रस्ता सरळ आहे. थोडं लांब असलं तरी कुठेही वळावं लागत नाही. त्यामुळे एवढेही अवघड नाही.

  पिट्टू: धन्यवाद. पण तू हसवणूक वाचलं नाहीस का? ते फारच भारी आहे. आपलं काय, पायीची वहाण पायी बरी.

  शंक्या: ईधर पे कुछ भी होता यारो... बच्चे को देखके कोई भी फसाता यारो... धन्यवाद...

  पश्या, मेहता: खूप खूप धन्यवाद मित्रांनो :)

  स्वांडया: अचानक सांगितल्यावर मला काहीच सुचणार नाही. मी तरी एवढ्या लहान वयात असले attempts केले नाहीत.

  ReplyDelete