Wednesday, October 26, 2011

अर्धा ग्लास


बोलणारे बोलत राहतात
नागवा करून बटाट्याला
पुन्हा पुन्हा सोलत राहतात

सदान् कदा काहीतरी
उणे-दुणे काढत राहतील
ग्लास अर्धा भरला तरी
अर्धा रिता म्हणत राहतील
बोलणाऱ्यांचा काय कधी
ग्लास भरतो काठोकाठ?
उथळ पाण्यामध्येच होतो
बुडबुड्यांचा खळखळाट

अर्धा तुझा ग्लास आहे
तोच खूप खास आहे
वाटेवरती अंधाराच्या
उजेडाचा ध्यास आहे
हतबल हरल्या मनांसाठी
आशेचा सुवास आहे
उत्साहाचे प्रसन्न गाणे
सहज विनासायास आहे

आज नव्या वळणावर
निराशेच्या सरणावर
ही उगवेल प्रसन्न पहाट
काट्यांमधुनी पाउलवाट
वाट तुडव तू त्वेषाने
काटे काढुनि काट्याने
काट्यांची तुज नशा मिळो
स्वप्नांना अन् दिशा मिळो

- निखिल अनिल जोशी
    गडचिरोली  
  १७ ऑगस्ट, २०११

 
(ही कविता अमोल पाटील या मित्राच्या वाढ-दिवसानिमित्त केली होती. अमोल इलेक्ट्रिकल इंजीनियर होऊन जळगावच्या एम.एस..बी.त लागला. तिथल्या सुखासीन परिस्थितीत काम करणे त्याला मानवले नाही. जिथे शिक्षा म्हणून बदली होते, अशा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात त्याने बदली मागून घेतली. धानोरा तालुका पूर्णपणे गोंड आदिवासींचा असून जंगलात लपला असल्याने नक्षलग्रस्त आहे. तिकडे बऱ्याच गावांत अजून वीजच पोचली नाही. इतर अनेक गावांत लाईन असूनही २०-२० वर्षे दुरुस्ती न झाल्याने वीज नाही. ज्या गावात वीज आहे, तेथे लाईनवर जंगलातल्या फांद्या पडून नेहमी ब्रेकडाऊन होत असते. मग ते नक्की कुठे झालंय हे शोधत अमोल ५०-६० किमी गाडीवरून निर्मनुष्य जंगलातून रात्री-अपरात्री फिरतो. सोबत एखादा लाईनमन. १४ उपलब्ध जागांपैकी फक्त ३ लाईनमनच्या जागा भरलेल्या आहेत. या भागात कोणी यायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे. जे ३ लाईनमन आहेत, ते पार खचून दारूच्या आहारी गेले आहेत. त्यांची क्रयशक्ती शून्य आहे. मग contract basis वर गावातल्याच लोकांना कामगार म्हणून घेतले जाते. त्यांच्याकडून खूप काम करून घेतले जाते, पण पगार वेळेत मिळत नाही. मग त्यापायी अमोलची चिडचिड सुरू होते. वरिष्ठांकडे जावे तर ते देखील हतबल असतात व हात वर करतात. साध्या कामासाठी वारंवार दूरदूर चकरा माराव्या लागतात. सरकारी कारभारात कामे पुढे ढकलली जातात. मात्र मार्च जवळ आला की महावितरण खडबडून जागे होते. १००-१५० रुपयांच्या थकबाकीसाठी गरीब लोकांची वीज कापली जाते. त्याच वेळी मुंबईच्या मॉल्समध्ये विजेची उधळपट्टी सुरू असते. मग त्याला 'मी कोण?', 'मी हा आटापिटा कशासाठी करतोय?' असे अध्यात्मिक प्रश्न पडू लागतात.
अशा हतबल परिस्थितीत आम्ही त्याला फुकटचे सल्ले देण्याचे काम करतो, बऱ्याचदा शिव्या देतो. मात्र अखंड उत्साहाने त्याची धडपड सुरू असते. बरीच झटपट केल्यानंतर एखादे गाव प्रकाशमान होते. तेंव्हा त्याच्या डोळ्यांतला आनंद साऱ्या 'कां'ची उत्तरे देऊन जातो. झापून कामे होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या स्टाफसोबत मैत्री केली आहे. त्यांची दारू सुटावी म्हणून अखंड प्रयत्न करतोय. व्यसनमुक्त होण्यासाठी सर्चच्या व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन येतो. दारू पिऊन घरी पडण्यापेक्षा कमीत कमी ऑफिसमध्ये यावे म्हणून त्याने टीव्हीसेट आणला आहे, वॉलीबॉलचे कोर्ट बनवले आहे. अभिमानाने सांगता येईल असे एक तरी काम प्रत्येकाने दर आठवड्यात करावे असे त्यांना टारगेट दिले आहे. त्यांच्याबरोबर तो कोजागिरीसारखे सणदेखील साजरे करतो. आहे त्या कठीण परिस्थितीत काम पुढे कसे न्यावे हे तो रोज शिकत आहे. आज आपले गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी तिथल्या लोकांना हक्काचा अधिकारी मिळाला आहे. अपुरे मनुष्यबळ व साधनांसह तो जी झुंज देत आहे, त्यामुळे कोणती क्रांती झाली नसली तरी आजूबाजूच्या ३ लाईनमनच्या व पाच-पन्नास आदिवासींच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधानाचे हसू आहे. या लढाईसाठी त्याला वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा!)

1 comment:

  1. Pahilya teem oli vachalyawar Padagaonkaranchya 'Salam' madhalya kavite sarakhi kavita vachayala milnar ki kay asa watala... Pan pudhachi kavita tyanchya 'Bolgani' madhalya kavitan sarakhii god ahe...! khupach surekh...!!!
    Parat parat vachavishi watali ani pratyek veli awadali... :) (Path hoil bahutek ata...)

    Baki Amol Patil la manapasun salam ani khoop khoop shubhechha...!!!!!!!!!!!

    ReplyDelete