Wednesday, March 8, 2017

वाढ नव्हे झाड दिवस

पूर्वप्रसिद्धी- निर्माण नियतकालिक, जुलै २०१२

स्वतः नायनांसोबत (डॉ. अभय बंग) गांधीजींचा सेवाग्राम आश्रम पाहण्याचं भाग्य मला मिळालं. नायनांचं बालपण वर्ध्याचं. बालपणीचे संस्कार सेवाग्राम आश्रमातील शाळेत घडले. पुढल्या आयुष्यात याच संस्कारांचा ठसा मनावर राहिला. गांधींच्या तत्त्वांवर आधारित असे थक्क करायला लावणारे काम उभे केले. मात्र माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्या उगमाबद्दल प्रचंड ओढ असते. सेवाग्राम आश्रम पाहून नायना थोडे हळवे झाले होते. कधीच आपल्या बालपणात बालपणात हरवून गेले होते. एरवी मोजके बोलणारे नायना तिथल्या प्रत्येक इमारत, प्रत्येक झाडाबद्दल भरभरून सांगत होते. मीही भारावून जावून ऐकत होतो, त्यांचा एकही शब्द पडू नये याची काळजी घेत होतो. शाळा, वसतीगृह, अतिथीगृह, महादेवभाई व बापूंचे कार्यालय अशा काही इमारती पाहिल्यानंतर जिची आतुरतेने वाट पाहत होतो त्या बापूकुटीजवळ आम्ही पोहोचलो. तिच्या साधेपणात किती सौंदर्य होते! मी तिच्याकडे आवाक् होऊन पाहत राहिलो.

कोणत्याही सर्वसामान्य खेड्यात सहज मिळेल अशा माती व लाकडापासून बापूकुटी बनलेली आहे. सिमेंट वा लोखंडाचा कुठेही वापर नाही. अगदी खिडक्यांचे गज व बीजागरीही बांबूपासून बनवलेले आहेत. कुठल्या मर्यादेपर्यंत आपल्या गरजा कमी करता येऊ शकतात त्याचे ही कुटी म्हणजे उत्तम उदाहरण आहे. लाखो रूपये खर्चून, हजारो मैल दूरच्या राजस्थानी टाईल्स बसवून, त्यावर मिरर पॉलिश केलेल्या व महागड्या रासायनिक रंगांनी भिंती रंगवलेल्या अशा कोणत्याही आधुनिक घरापेक्षा ती कुटी मला खूप सुंदर वाटली..

बापूकुटीबद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण त्यातली एक गोष्ट मला विशेष भावली. कुटीला लागूनच बांबूचे कुंपण आहे, कुटीइतकेच सुंदर. कुंपणाच्या बाहेर तीन भले मोठे वृक्ष आहेत, दोन पिंपळाचे व एक बकुळाचा. पहिला पिंपळ गांधी प्रथम सेवाग्रामला आले होते तेंव्हा लावण्यात आला होता, तर दुसरा पिंपळ विनोबा भूदान यात्रेवरून परतले तेंव्हा लावण्यात आला होता. Celebration ची किती सुंदर पद्धत आहे ही! शेकडो वर्षे जगणाऱ्या झाडांच्या रूपाने तो क्षण अमर होऊन जातो. आपल्या आनंदाचा इतरांना त्रास नाही व पर्यावरणावरही कोणताच ताण नाही. बकुळाचे झाड कस्तुरबा गेल्यानंतर लावण्यात आले होते. दुःखाला सामोरे कसे जावे याचा किती सुंदर मार्ग आहे! मृत्यूचा सामना करण्यासाठी नवीन जीवाची निर्मिती! आज हा बकुळाचा वृक्ष कस्तुराबांचं जिवंत स्मारक बनला आहे (नाही तर आजकालचे नेते जिवंतपणीच स्वतःचे भले मोठे पुतळे उभे करतात.). सर्चमध्येदेखील दोन वृक्ष असेच आनंदाच्या क्षणी लावले गेले आहेत. एक वडाचे रोप, अम्मा-नायानांचे (डॉ. राणी व अभय बंग यांचे) गुरू कार्ल टेलर सर्चमध्ये आले होते तेंव्हा त्यांच्या हस्ते हॉस्पिटलजवळ लावण्यात आले होते. आज या वडाचा वटवृक्ष झाला आहे. सर्चच्या दवाखान्यात येणारे सर्व पेशंट्स त्याच्या सावलीत विश्रांती घेतात. दुसरे वडाचे रोप लावून तिबेटचे बौद्ध लामा रिम्पोचे यांच्या हस्ते अतिथीगृहाचे उद्घाटन झाले होते. आज हेदेखील झाड खूप मोठे झाले आहे.
गांधींनी सुरू केलेली परंपरा गांधीं---विनोबा---अम्मा-नायना या वाटेने पुढे सरकत राहिली आहे. आपण निर्माणींनी ती पुढे न्यायाला पाहिजे. काय अशक्य आहे? एक सहज विचार मनात आला होता. आपल्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून आपण एक रोप दिलं तर? वाढदिवस हे वाढीचे प्रतीक. वाढीसोबत जबाबदारी ही ओघानेच आली. पार्ट्या आणि इतर materialistic gifts देण्याऐवजी आपण एक रोप किमान एक वर्ष जगवण्याची जबाबदारी देऊयात का? एका वनखात्याने किंवा काही ठराविक लोकांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यावरणाची काळजी घ्यावी त्यापेक्षा हा विकेंद्रीत मार्ग सोपा व सोयीस्कर नाही का?

मध्ये वृंदनच्या शाळेत (पवनीला) दोन दिवस मुलांशी गप्पा मारायला व त्यांच्यासोबत खेळायला गेलो होतो. मुलांना विचारले,
मुलांनो तुम्ही तुमच्या मित्राच्या वाढदिवसाला काय gift देता रे?”
चॉकलेट, पेन्सिल, व्हीडीओ गेम, ...”
चॉकलेट किती वेळ टिकते रे?”
पाच मिनीटे”
पेन्सिल?”
एक महिना"
व्हीडीओ गेम?”
एक वर्ष"
आम्ही आमच्या मित्राला काय gift देतो सांगू?”
होssss”
आम्ही देतो एक झाड. झाडापासून काय मिळते रे?”
फळे, फुले, प्राणवायू, लाकूड, ...”
एका झाडापासून फळे-फुले, प्राणवायू, काटक्या किती वेळ मिळत राहतात?”
आयुष्यभर"
मग आपण आपल्या मित्राला ५ मिनीटे आनंद देणारे चॉकलेट gift द्यायचे, का आयुष्यभर gift देणारे झाड?”
झाsss"
मुलांना कल्पना आवडली. त्यांनी वर्गातल्या मुलाच्या वाढदिवसाला सगळा वर्ग मिळून एक झाड देण्याचे मला आश्वासन दिले आहे.

आम्ही सर्चमध्ये काम करणाऱ्या निर्माणींनी ही प्रथा सुरू केली आहे. आम्ही प्रथम दोन करवंदाची झाडे जागवण्याची जबाबदारी घेतली. नंतर गौरीच्या वाढदिवसाला लिंबाचे, कालिंदीला फणसाचे तर हेमराज व चारूताला चिक्कूचे झाड भेट म्हणून दिले. आपण निर्माणींनी वाढदिवस हा झाडदिवस म्हणून साजरा केला तर दरवर्षी महाराष्ट्रात किमान ५०० नवीन झाडे दिसतील व आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलल्याचे आपल्यालाच समाधान मिळेल.




(फणसाच्या व चिक्कूच्या झाडासह कालिंदी व चारुता)


निखिल जोशी

No comments:

Post a Comment