Wednesday, March 8, 2017

७ दिवस, ७० प्रश्न

पूर्वप्रसिद्धी- लोकमत ऑक्सिजन, २३ जुलै, २०१५

Displaying IMG_20150507_094635.jpg


झुंज दुष्काळाशी’ या कार्यक्रमा अंतर्गत आम्ही जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या सोनाळे या गावात एक आठवडा काम करण्यासाठी गेलो. पाणलोट विकासाचे काम होते. पाणलोटाचे नवे पैलू कळलेच, पण दुष्काळ, शेती व गावातल्या इतरही समस्यांबद्दल डोळे उघडले.


सोनाळे गावात काम करताना लक्षात आले, की ‘दुष्काळ’ सहज दिसत नाही, पण तो सर्वत्रच आहे. एका बाजूला गावाच्या मध्यवर्ती भागातील हौद पाण्याने भरला होता. गावाच्या टाकीत पाणी होतं. गावात नळ होते. मात्र दुसऱ्या बाजूला नळाला ५ दिवसांतून एकदा पाणी यायचं. अंघोळीसारख्या क्षुल्लक गोष्टीचे खूप planning करायला लागायचं. पाण्याअभावी आम्हाला भेटलेले सर्वच शेतकरी प्रचंड नुकसान झाल्याचं सांगायचे. सरासरी उत्पन्नाच्या १० ते २० टक्केच उत्पन्न झाल्याचे ते सांगत. आणेवारीचा अधिकृत आकडा ४२ पैसे होता. दुष्काळ ही गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचं लक्षात आलं.
शेतात पडणारं पावसाचं पाणी आणि त्यासोबत शेतातील सुपीक मातीचा थर बांधबंधिस्ती अभावी वाहून जातो. शेतातले पाणी व माती शेतातच रहावी यासाठी शेतात बांधबंधिस्ती कशी करता येईल याचे शेतकऱ्याच्या सोबत नियोजन करण्याचं आमचं काम होतं. त्यासाठी आम्ही कृषी विज्ञान केंद्र, जालना येथे प्रशिक्षण घेतलं होतं. सोनाळे गावासाठी वसुंधरा योजना मंजूर झाली होती. त्याअंतर्गत शेतात बांधबंधिस्ती सरकारी खर्चाने करण्यासाठी गावात ट्रॅक्टर तयार होता. मात्र बांधबंधिस्तीचे नियोजन करणं आणि ती प्रत्यक्ष होणं यात खूप फरक असल्याचं जाणवलं. अनेक शेतकरी आम्हाला बरं वाटावं म्हणून नियोजनात सहभागी व्हायचे. त्यांची देहबोली मात्र वेगळंच बोलायची. पाणी व माती अडवण्यासाठी शेताच्या मध्ये बांध घातल्यास मशागत करणे शेतकऱ्याला कठीण जाते. बांध बांधण्यासाठी शेतातली माती ‘वाया’ घालवण्यास शेतकरी सहज तयार होत नाही. काही शेतकऱ्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं, ‘तुम्ही हे जे काही सांगत आहात ते खरं आहे, पण आमची ती मुख्य समस्या नाही. आमच्या शेतमालाला भावच मिळत नाही. त्यावर काही करता येतंय का बघा.’ यावर्षी हे नियोजन करून खूप शिक्षण झालं. मात्र कागदावरचे बांध शेतात उभे राहायचे असतील तर ७ दिवस काम करून स्वतःवर खूष होण्यात अर्थ नाही. ही लांब काळाची लढाई आहे असं जाणवलं.
दुष्काळात छोट्या-मोठ्या सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. आम्ही जवळपास ८० शेतकऱ्यांना भेटलो. जमाखर्चाचा ताळेबंद एकाच शेतकऱ्याने ठेवला होता. इतर शेतकऱ्यांनी हे आकडे पाहून अजूनच निराशा येईल या भीतीने ताळेबंदच ठेवत नसल्याचे सांगितले. यापैकी कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या मुलाने शेती करावी असं वाटत नव्हतं. आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही अनेक शेतकरी कर्ज काढून आपल्या मुलांना शहरात शिकवत होते.
पहिल्या दिवशी आम्ही सोनाळे गावात टमटमने रात्री ९ वाजता पोचलो. टमटमचा लाईट पाहून रस्त्याच्या कडेला संडासला बसलेल्या स्त्रिया उभ्या राहून तोंड लपवून घ्यायच्या. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी संडास किती गरजेचा आहे हे जाणवलं. मात्र घराघरात संडासबद्दल सर्वे करताना वेगळेच चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. सरकारतर्फे १२ हजार रुपये मिळत असूनही संडास बांधण्यासाठी अनिच्छा दिसून आली. कदाचित पुरुषांना ती एवढी महत्त्वाची समस्या वाटत नसावी. शिवाय पाण्याची कमतरता असताना प्रती व्यक्ती पाच लिटर पाणी संडाससाठी रोज वापरावेसे कुणाला वाटेल? ज्यांनी संडास बांधले होते, त्यांचे सांडपाणी घराबाहेरच उघड्या गटारात सोडले जायचे. काही ठिकाणी गटारी नसल्याने रस्त्यावरच सांडपाणी सोडले जायचे. गटारींचा उतार व्यवस्थित नसल्यामुळे / गाळ साचल्यामुळे / प्लास्टिकचा कचरा अडकून गटारी तुंबल्याचे चित्र हमखास दिसायचे. ग्रामपंचायतीमार्फत गटारे साफ करण्यासाठी एकाच व्यक्तीची नेमणूक झाली होती व त्यामुळे गटारे साफच व्हायची नाहीत. ‘वास आणि डास’ यामुळे त्रस्त होऊन घरी संडास असूनही हागणदारीचा वापर करत असल्याचे काही स्त्रियांनी सांगितले. संडासांचे सांडपाणी घरांसमोर गावात जागोजागी साचले होते. केवळ संडास बांधून गावातील स्वच्छता व आरोग्याची स्थिती सुधारेल का बिघडेल असा प्रश्न मला पडला.
गावातील सर्वांत गरीब कुटुंबाशी संवाद साधायचा म्हणून आम्ही एका विधवा स्त्रीच्या घरी गेलो. अतिक्रमित जागेवर झोपडी बांधून त्या राहत होत्या. झोपडीत अगदीच मोजके सामान होते. त्यांना दोन मुली होत्या. एक मजुरीला गेली होती. दुसरी मुलगी खूपच उदास दिसत होती. त्या बाई म्हणाल्या, ‘ती अशीच दुःखी असते. काहीच बोलत नाही.’ ५००० (!) रुपये हुंडा देऊन तिचं लग्न लावून दिलं होतं. काही वर्षांनी ‘ठिबक साठी माहेरून पैसे घेऊन ये’ म्हणून सासरच्यांनी छळायला सुरुवात केली. त्या मुलीने नकार देताच तिला पेटवून दिली. मुलगी कशीबशी जीव वाचवून माहेरी परतली. वकील व कोर्टकचेरी करिता पैसे नाहीत म्हणून तिच्या आईने ही केस ताणून धरली नाही. त्या दिवशी त्या मुलीने आईच्या सांगण्यावरून लुगडं काढून आम्हा सर्वांना जाळल्याची जखम दाखवली आणि आमच्या सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. पुढचा तासभर कोणीच कुणाशी बोललं नाही. आपल्या पाहण्यात हुंडाबळीची एकही केस नाही म्हणून ती समस्याच नाही असा समज करून घेतलेल्या मला ती एक थप्पडच होती. ‘तुझ्या सुरक्षित कोषात राहून तू खरेखुरे जग, जिथे ७०% लोक राहतात, पाहिलेच नाहीस’असा तो संदेश होता.
आमच्या ७ दिवस जाण्याने कुठली समस्या सुटलीच नाही. पण अनेक प्रश्न पडले- स्वतःबद्दल, गावाबद्दल. त्यातली एकही समस्या सोडवायची तर ७ वर्ष तरी द्यावी लागतील. समस्यांनी त्रस्त, पण प्रेमळ ७० टक्क्यांसोबत नातं जुळलं. ७ दिवस आपल्याला ज्या गावाने शिकवलं, त्याचं आपण देणं लागतो ही भावना मनात पक्की बसली.

निखिल जोशी

No comments:

Post a Comment