Wednesday, March 8, 2017

मायमराठी- वाचन संस्कृती वाढवणारी चळवळ

पूर्वप्रसिद्धी- करीअर वृत्तांत, लोकसत्ता, १३ ऑगस्ट, २०१२

आजकालच्या तरुण पिढीला वाचनाची मुळी आवडच नाही’. एखाद्या शेंगदाण्याचं टरफल फेकावं इतक्या सहजपणे आपण आपले ‘एक्स्पर्ट ओपिनिअन’ फेकून जातो. आपल्या नजरेसमोरील काही मोजक्या तरुणांच्या वर्तणुकीवरून समस्त तरुणाईला दोष द्यावा व प्रश्न निकालात काढावा इतके सोपे हे समीकरण आहे का? का या समस्येला तरुणाईचा आळस व बेजबाबदारपणा याशिवाय इतरही काही पैलू आहेत? आज पुण्या-मुंबईच्या बाहेर किती जिल्ह्याच्या ठिकाणांपर्यंत पुस्तके पोचतात (तालुके तर सोडूनच द्या)? आणि पोचलीच तर किती तरूणांना आपल्या मर्यादित उत्पन्नातून पुस्तके विकत घेणे परवडते? आणि परवडले तरी सर्वसामान्यांना वाचण्याची इच्छा व्हावी अशी किती पुस्तके उपलब्ध होतात? विदर्भातील मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये तरुणाईच्या खिशाला परवडतील आणि मनाला भावतील अशी पुस्तके उपलब्ध करून द्यायचा चंग बांधलाय शरद अष्टेकर या तरुणाने. “महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे ११ कोटी आहे. त्यातील किमान ७ कोटी लोकसंख्या मराठी भाषिक आहे. महाराष्ट्रात मराठी पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय करण्यास प्रचंड वाव आहे. शिवाय विदर्भासारख्या भागात स्पर्धादेखील नाही. हे आपलं दुर्दैव आहे की विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मराठी पुस्तके अजूनही मिळत नाहीत आणि आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याच्या मागे आपण लागलोय.” सोयी-सुविधांकडे पाठ फिरवून एका अनवट वाटेने विदर्भातल्या आपल्या मित्रांपर्यंत पोहोचायचं शरदने ठरवलंय. प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीत एक संधी दडलेली असते. ही संधी ओळखणं हे शरदने उण्यापुऱ्या दोन वर्षात मिळवलेल्या थोड्या-फार यशाचं गमक आहे.
दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरमध्ये असताना मैत्रिणीला भेट देण्यासाठी शरद काही पुस्तकं शोधत होता पण त्याला ती पुस्तकं मिळाली नाहीत. महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं चांगलं मराठी पुस्तक मिळू नये याने तो फार अस्वस्थ झाला. जर जिल्ह्याच्या ठिकाणी ही परिस्थिती तर तालुका अन् गाव पातळीवर तर विचारायलाच नको! आपणच अशी चांगली पुस्तके इथे का उपलब्ध करून देऊ नयेत? असा विचार त्याच्या मनात घोळू लागला. पुढच्या वेळी चंद्रपूरला येताना त्याने आपल्या जवळच्या ४००० रुपयांची समकालीन आणि राजहंस प्रकाशनाची त्याच्या आवडीची २१ पुस्तके आणली अन पुस्तक विक्री व्यवसायाला सुरवात केली. अशा पद्धतीचा व्यवसाय करण्याचा कसलाही अनुभव त्याच्याजवळ नव्हता. त्याने एका कापडी पिशवीत पुस्तके टाकली आणि भर चंद्रपूरमध्ये पुस्तकांसाठी गिऱ्हाइक शोधत तो फिरू लागला. ही पुस्तकं कोणाला विकायची, कशी विकायची याचा कसलाही अंदाज त्याला नसल्यामुळे बराच वेळ फिरून आणि बऱ्याच लोकांना भेटूनही पुस्तकं विकली जाईनात. शेवटी दोन दिवसांनी एका कॉलेजमधील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना अच्युत गोडबोले यांचे ‘अर्थात’ हे पुस्तक कसे उपयुक्त आहे हे पटवून देण्यात तो यशस्वी झाला. पाहिलं पुस्तक विकलं गेलं आणि ‘माय मराठी book distributions’ चा श्रीगणेशा झाला.
पहिले ६ महिने कठीण होते. पुस्तके विकण्यासाठी तो डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, बँक कर्मचारी अशा अनेक लोकांना भेटायचा. गिऱ्हाइक शोधत उपाशी पोटी पायी फिरण्याची वेळ हमखास त्याच्यावर यायची. मात्र याच काळात त्याच्या अनेक ओळखी झाल्या. कोणाला कोणत्या पुस्तकांची गरज आहे हे त्याच्या लक्षात येऊ लागलं. हळूहळू पुस्तकांचा खप वाढला व व्यवसायात जम बसू लागला. हे काम जमतं असा विश्वास आल्यावर त्याने चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या भागात छोटी छोटी पुस्तकं प्रदर्शन भरवायला सुरवात केली. या प्रदर्शनांच्या माध्यमातून तो विविध शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू लागला.
याच दरम्यान शरदचा डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी सुरू केलेल्या निर्माण या युवा चळवळीशी संबंध आला. आपला व्यवसाय आपण कोणासाठी करतो आणि का करतो या प्रश्नांची उत्तरे मी व माझा फायदा या ‘मी’पणाच्या संकुचित भिंतींपलीकडे जातात असा आत्मविश्वास त्याला निर्माणच्या निमित्ताने मिळाला. निर्माणच्या शिबिरांमध्ये डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्यासारखे गुरू मिळालेच, पण त्यासोबतच आपल्या कौशल्यांचा उपयोग समाजातील समस्या सोडवण्यासाठी करण्याची प्रेरणा घेऊन आलेल्या मित्र-मैत्रिणीही मिळाल्या. निर्माणच्या युवांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यास शरदची मदत झाली तर शरदने चालू केलेल्या ह्या वाचन चळवळीच्या भौगोलिक सीमा ओलांडण्यास निर्माणच्या युवांचा हातभार लागला. खुद्द निर्माणच्या शिबिरात शरदने लावलेल्या पुस्तक प्रदर्शनाला २ दिवसांत २० हजारांची पुस्तके खरेदी करून निर्माणींनी प्रचंड प्रतिसाद दिला. समाजातील एखादी नेमकी समस्या घेऊन ग्रामीण भागात काम करणाऱ्या निर्माणींनी शरदचे काम आपापल्या खेड्यात पोहोचवले. या निमित्ताने चंद्रपूर येथे काम करणाऱ्या शरदच्या पुस्तकांचे प्रदर्शन महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या सांगली जिल्ह्यात संदीप ढोले या तरुण सामाजिक उद्योजकाच्या मदतीने लागले. तसेच मेळघाटच्या इतिहासातले पहिलेवहिले पुस्तक प्रदर्शन डॉ. प्रियदर्श तुरे या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या तरुण डॉक्टरच्या मदतीने शरदने लावले. मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातही ३ दिवसांत ४० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. स्वतःच्या समाधानासोबतच समाजाला उपयोगी काम करण्यासाठी अतिशय सुंदर असे परस्परावलंबी नाते शरद व इतर निर्माणींमध्ये तयार झाले.
नुकतेच बाळसे धरू लागलेल्या शरदच्या व्यवसायाला हातभार लावला तो चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने. त्याच्या स्टॉलमध्ये आपल्या पुस्तकांचा स्टॉल लावण्याची जबाबदारी ‘मॅजेस्टिक’ प्रकाशनाने त्याला दिली. एकट्या साहित्य संमेलनात त्याने तब्बल २ लाख रुपयांची पुस्तके विकली. या निमित्ताने त्याची अनेक प्रकाशनांशी ओळख झाली. साहित्य संमेलनाने शरदच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केले. याच जोरावर त्याला प्रकाशकांकडून पुस्तके उधार मिळू लागली. याचा फायदा करून घेत घेत शरदने आपल्या कामाचा व्याप हळूहळू वाढवला. पुस्तक विक्रीच्या दृष्टीने आजवर जाणते अजाणतेपणी दुर्लक्षिल्या गेलेल्यांपैकी किमान काही लोकांपर्यंत शरद पोहोचला. मात्र खेड्यापाड्यात राहणाऱ्या बहुसंख्य सर्वसामान्यांनी पुस्तके वाचायची असतील तर पुस्तकांच्या किंमती कमी होण्याची गरज आहे. आज वाचकवर्ग कमी असल्यामुळे मराठी पुस्तकांच्या केवळ हजाराच्या आवृत्त्या निघतात. कमी पुस्तके छापल्यामुळे प्रिंटिंगचा खर्च व त्यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढतात. किंमती वाढल्यामुळे पुन्हा वाचक संख्या कमी होते. हे दुष्टचक्र भेदण्याची आज गरज आहे. त्यादृष्टीने पुढची पावले उचलण्याचा शरदने निर्णय घेतलाय. आपला दोन वर्षांचा अनुभव, त्याच्यावर ज्यांनी विश्वास टाकला असा वाचक व प्रकाशक वर्ग या भांडवलावर स्वस्त दरात पुस्तके मिळावीत म्हणून तो विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पुस्तकांची रिटेल चेन सुरू करतोय. अडीचशे रूपये वार्षिक वर्गणी देऊन ‘मायमराठी पुस्तक सभासद’ होणार्‍या आपल्या वाचकांच्या कोणत्याही खरेदीवर 25% सूट देण्याची त्याची अभिनव योजना आहे. रिटेल चेन व पुस्तक सभासद योजना यांच्यामार्फत विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील वाचकांना आपल्याच जिल्ह्यात हवी ती पुस्तके स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत यासाठी त्याने कंबर कसली आहे. याच साखळीतले पहिले दुकान गडचिरोली येथे येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. पहिले दुकान नागपूरला न उघडता गडचिरोलीत उघडणे यात थोडा धोका आहे. पुस्तके लगोलग विकली जातील याची शाश्वती नाही. तरीही त्याने हे धाडसी पाउल उचलण्याचा निर्णय घेतलाय. कठीण परिस्थितीत काम करत असल्यामुळे त्याच्या संयमाची परीक्षा होणार आहे. त्याच्यासोबत प्रकाशकांनीही थोडा संयम ठेवावा अशी त्याची अपेक्षा आहे.
अनेक अडचणींवर मात करत शरदचा व्यवसाय केवळ तग धरून उभा नाही तर हळूहळू भरभराटीला येत आहे. त्यासाठी शरदच्या स्वभावाचे काही पैलू कारणीभूत आहेत. त्याचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्याला स्वतःला वाचायला खूप आवडते. दहावी नापास झाल्यानंतर पेपर टाकताना लागलेली वाचनाची सवय त्याने काळजीपूर्वक जोपासलेली आहे. ‘वाचायला आवडते म्हणून पुस्तक विकतो’ एवढे साधेसोपे त्याचे समीकरण आहे. आपल्या आवडीचे रूपांतर करियरमध्ये केल्यामुळे त्याला व्यवसायाचा ताण येत नाही. त्याचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे कोणाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल हे त्याला चांगले कळते. इथे त्याला आपल्या वाचनाच्या सवयीचा खूप फायदा होतो. त्याने स्वतः अनेक पुस्तके वाचल्यामुळे ती का वाचण्यासारखी आहेत हे तो इतरांना सांगू शकतो. त्याचा तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे त्याच्यासाठी जगणे आणि व्यवसाय ह्यात भेद नाही. आपल्या रोजच्या कामांप्रमाणे तो अगदी सहज पुस्तके विकतो, तसेच पुस्तके विकता विकता समृद्ध आनंदी जीवनही जगू शकतो. तो त्याची एक आठवण सांगतो, “एकदा मी पुस्तके घेऊन गडचिरोलीला येत होतो. गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे बऱ्याचदा येणार्‍या जाणार्‍य़ा वाहनांची झडती होते, तशी माझीही झाली. माझं सामान तपासताना त्यात पोलिसांना पुस्तके मिळाली. त्यातल्या मिलींद बोकील यांच्या ‘शाळा’ ह्या पुस्तकाबद्दल मी त्यांना सांगितले. ते ऐकून साक्षात झडती घेणाऱ्या पोलीसांनी माझ्याकडून ‘शाळा’ विकत घेतले. एवढेच नाही तर पुढच्या वेळी येताना आणखी पुस्तके आणण्याची त्यांनी मला ऑर्डर दिली.” तसे पहायला गेले तर एक पुस्तक विकले जाणे ही काही त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. मात्र त्याबद्दल सांगतानाही त्याच्या डोळ्यांत समाधान दिसून येते.
आपल्या या छोटेखानी प्रवासात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोणत्याही व्यवसायाचा प्राणवायू म्हणजे भांडवल. मात्र त्याचीच खूपदा चणचण भासते. तसेच नव्या गावांत एखाद्या नव्या व्यवसायासाठी जागा मिळवणे हीदेखील तारेवरची कसरत असते. बऱ्याचदा मदतीसाठी मनुष्यबळ ठेवणेही परवडत नाही. पुस्तकांची प्रदर्शनी मांडताना दोनदोनशे किलोमीटर पुस्तकांची बॅग घेऊन दुचाकीवरून एकटे हिंडावे लागते. या प्रवासात पाठ व मान पार मोडून जातात. ह्या अंतर्गत अडचणींचा सामना करता करता प्रकाशकांनाही सांभाळून घ्यावे लागते. बऱ्याच प्रकाशकांची पुण्या-मुंबईबाहेर पुस्तके विकण्याचा धोका पत्करण्याची तयारी नसते. विदर्भात विकण्यासाठी पुस्तके मिळवणे ह्या मोठ्या अग्निदिव्यातून त्याला वारंवार जावे लागते. या भागात पुस्तक व्यवसाय हाच मुळी नवीन असल्यामुळे ब-याचदा पुस्तके लगेच विकली जातील याची खात्री नसते. पैशांच्या आवक-जावक प्रक्रियेत थोडी अनिश्चितता असल्यामुळे प्रकाशकांकडून उधारीवर पुस्तके घ्यावी लागतात. मात्र या अडचणींनी तो खचून जात नाही. ‘आजवर ज्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचलीच नाहीत त्यांच्यापर्यंत पुस्तके घेऊन पोहोचायचे’ असे मोठे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले अडचणींचे ओझेही सुसह्य होते. “ग्रामीण भागात पुस्तकांची खरंच गरज आहे. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरील दुर्गम अशा धानोरा तालुक्यात डी. एड. कॉलेजमधील तरुणांशी संवाद साधण्यासाठी मी गेलो होतो. केवळ अर्ध्या तासाच्या आमच्या संवादानंतर त्या तरुणांनी तब्बल दोन हजारांची पुस्तके विकत घेतली. अशा अनेक खेड्यांत आजवर कोणी पोहोचलेच नसेल. त्यांच्यापर्यंत जाण्याचा धोका तर घेऊन बघूयात. भालचंद्र नेमाडे म्हणतात, ‘जनावर एकदा गवत खाऊ लागले की कधी ना कधी तरी सकस चारा खायला सुरुवात करतेच.’ मीही नाशिक जिल्ह्यातील घोटी गावातून आलेला दहावी नापास तरुण होतो. रस्ता भटकू शकलो असतो. वाचनाचे वेड लागले व मग पुस्तकांनीच सावरले. बारावीपर्यंत औपचारिक शिक्षण पूर्ण केले तरी आजवरच्या सर्व प्रवासामध्ये पुस्तकेच माझे गुरु आहेत. वाचनाचा आनंद, कायम नवीन शिकण्याची प्रेरणा, उदरनिर्वाहाचे व सामाजिक योगदानाचे साधन ज्यांनी मला दिले अशा पुस्तकांचा मी कृतज्ञ आहे.”
योग्य आकाराची तरफ मला कुणी आणून दिली तर मी ही अख्खी पृथ्वीसुद्धा हलवून दाखवीन,’ असे आर्किमिडीज म्हणाला होता. ‘आजच्या युगात ही तरफ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ‘ज्ञान’ आहे’ असं डॉ. अभय बंग म्हणतात. ही ज्ञानाची तरफ सर्वसामान्यांच्या हातात द्यायचा शरदचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना आपण सर्वसामान्यांनी, वाचन संस्कृती पसरावी असे मनापासून वाटणाऱ्या सुजाण नागरिकांनी व प्रकाशकांनी साथ दिली तर त्याच्या प्रयत्नांचे स्वरूप केवळ व्यवसायापुरते मर्यादित राहणार नाही, तर उभ्या महाराष्ट्राला चेतवणारी ही एक वाचक चळवळ बनेल.
शरद अष्टेकर (9011135057, 8087288872)
निखिल जोशी 

No comments:

Post a Comment